मुंबई : एअर एशियाचं लाच प्रकरण समोर आल्यानंतर यूपीए सरकारच्या काळातील हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जेव्हा एअर एशियाची डील झाली तेव्हा मी हवाई वाहतूक मंत्री नव्हतो. या डील बाबत मला काहीही माहिती नाही, असं प्रफुल पटेल म्हणाले आहेत. एअर एशियाला परदेशामध्ये विमान पाठवण्याचे अधिकार देण्यात आले. याचं लायसन मिळण्यासाठी आपण ५ मिलियन डॉलर लाच दिल्याचा आरोप एअर एशियाचे सीईओ टोनी फर्नांडिस यांनी केला. सीबीआयनं टोनी फर्नांडिस यांच्यासह तिघांविरोधात लाच दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१३-१४ साली एअर एशियाला भारतात सेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. पण परदेशात सेवा देण्यासाठी एअर एशियाला नियमांचा अडथळा येत होता. त्यामुळे टोनी फर्नांडिस यांनी हवाई वाहतूक मंत्रालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच दिल्याचं सीबीआयच्या एफआयआरमध्ये आहे.


भारतातून परदेशात विमानसेवा देण्यासाठी दोन अटींचं पालन करावं लागतं. विमान कंपनीला देशांतर्गत विमान सेवेचा ५ वर्षांचा अनुभव आणि कंपनीकडे कमीत कमी २० विमानं असणं बंधनकारक आहे. हाच नियम हटवण्यासाठी टोनी फर्नांडिस यांनी लाच दिल्याचं सीबीआयनं एफआयआरमध्ये म्हंटलं आहे.