पर्यावरण संवर्धन आणि विकास एकत्रितरित्या झाला पाहिजे- प्रकाश जावडेकर
दिल्ली मेट्रोच्या पहिल्या स्थानकासाठी २० ते २५ झाडे कापण्यात आली. तेव्हाही लोकांकडून विरोध झाला.
लखनऊ: केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आरे कॉलनीतील वृक्षतोडीचे समर्थन केले आहे. ते शनिवारी लखनऊ येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना शुक्रवारी रात्री आरे परिसरातील सरकारकडून करण्यात वृक्षतोडीविषयी विचारणा करण्यात आली. यावेळी जावडेकर यांनी म्हटले की, आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्याचा निर्णय योग्यच आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन एकत्रच झाले पाहिजे, असे जावडेकर यांनी सांगितले.
यावेळी जावडेकर यांनी दिल्ली मेट्रोचे उदाहरण दिले. उच्च न्यायालयाने आरे जंगल नसल्याचा निर्वाळा दिला आहे. दिल्लीतही काही वर्षांपूर्वी मेट्रो आली होती आणि आज ती जगातील सर्वोत्तम वाहतूक व्यवस्थांपैकी एक आहे. दिल्ली मेट्रो कशी विकसित झाली? दिल्ली मेट्रोच्या पहिल्या स्थानकासाठी २० ते २५ झाडे कापण्यात आली. तेव्हाही लोकांकडून विरोध झाला. परंतु मेट्रो प्रशासनाने एका झाडाच्या मोबदल्यात पाच नवीन झाडे लावण्याचे धोरण अवलंबिले. सध्या दिल्लीत मेट्रोची २७१ स्थानके आहेत. त्याचवेळेस दिल्लीतील जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे. आजघडीला दिल्लीत ३० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. हाच विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा मंत्र आहे. या दोन्ही गोष्टी एकत्रपणेच झाल्या पाहिजेत, असे जावडेकर यांनी म्हटले.
आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी उच्च न्यायालयाचा निकाल लागताच संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे कापायला सुरुवातही झाली. ही गोष्ट समजताच पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले होते. त्यांना तात्काळ आरे परिसरात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी याठिकाणी जमण्यास मज्जाव केल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. सध्या आरे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकार आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम असले तरी शिवसेनेने या विरोधात भूमिका घेतली आहे. आरेचा विषय सोडणार नाही. झाडे तोडणाऱ्यांचे काय करायचे ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकारपरिषद घेऊन रोखठोक बोलू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.