Tirupati Laddoo Controversy: तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) मिळणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी देशात खळबळ उडवली आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दुसरीकडे दक्षिणेत अनेक अभिनेते यावर व्यक्त होत असून त्यांच्यातही शाब्दिक चकमक सुरु आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) आणि अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यातही जोरदार शाब्दिक वाद झाला आहे. प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांच्यावर टीका केल्यानंतर आता त्यांनी उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवन कल्याण आज सकाळी विजयवाडा येथे आपल्या 11 दिवसांच्या 'प्रायश्चित्त दीक्षा' विधीसाठी विजयवाडा येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रकाश राज यांनी धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल त्यांना फटकारलं. ज्यानंतर प्रकाश राज यांनीही आपण लवकर उत्तर देऊ असं म्हटलं. 


प्रकाश राज काय म्हणाले होते?


देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना पवन कल्याण यांनी केली होती. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली होती. "तिरुपती बालाजी प्रसादमध्ये मिसळलेल्या प्राण्यांच्या चरबीच्या (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) निष्कर्षांमुळे आम्ही सर्वजण व्यथित झालो आहोत. वायसीपी सरकारने स्थापन केलेल्या टीटीडी बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आमचे सरकार कठोर निर्णय घेण्यास वचनबद्ध आहे. परंतु, यामुळे मंदिरांचे अपवित्रीकरण, त्यांच्या जमिनीचे प्रश्न आणि इतर धार्मिक प्रथांवरील अनेक मुद्द्यांवर प्रकाश पडतो," असं ते म्हणाले होते.


ते पुढे म्हणाले, "संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 'सनातन धर्म संरक्षण मंडळ' स्थापन करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय स्तरावर धोरणकर्ते, धार्मिक प्रमुख, न्यायपालिका, नागरिक, मीडिया आणि इतरांनी यावर चर्चा केली पाहिजे. 'सनातना धर्मा'ची कोणत्याही प्रकारची विटंबना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे". 



यावर प्रकाश राज यांनी टीका करत म्हटलं होतं की, "प्रिय  पवन कल्याण... हे अशा राज्यात घडले आहे जिथे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. कृपया या प्रकरणाचा तपास करा. दोषींचा शोध घ्या आणि कठोर कारवाई करा. तुम्ही भीती का पसरवत आहात आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर का नेत आहात?". आपल्या देशात पुरेसा जातीय तणाव आहे (केंद्रातील तुमच्या मित्रांचे आभार) असं म्हणत प्रकाश राज यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.


पवन कल्याण यांचं उत्तर


प्रकाश राज यांच्या टीकेला उत्तर देताना पवन कल्याण म्हणाले की, “मी हिंदू धर्माचे पावित्र्य आणि अन्न भेसळ यांसारख्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करत आहे. मी या विषयांवर का बोलू नये? मी प्रकाश राज तुमचा आदर करतो आणि धर्मनिरपेक्षतेचा विचार केला तर ते सामंजस्याने असलं पाहिजे. तुम्ही माझ्यावर टीका का करताय हे समजत नाही. सनातन धर्मावरील हल्ल्यांच्या विरोधात मी बोलू नये का? प्रकाश राज यांनी यातून धडा शिकायला हवा. चित्रपटसृष्टी आणि इतरांनी यातून वाद निर्माण करु नये. मी सनातन धर्माबद्दल खूप गंभीर आहे".


पुढे ते म्हणाले की, "अनेक टीकाकारांनी अयप्पा आणि देवी सरस्वतीला टार्गेट केलं आहे. सनातत धर्म सर्वात महत्वाचा आहे. प्रत्येक हिंदून यासंदर्भात जबाबदारी घ्यायला हवी. जर हेच दुसऱ्या धर्मात झालं असं तर मोठी आंदोलनं झाली असती".


प्रकाश राज यांनी यानंतर एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, "प्रिय पवन कल्याण गारु, मी तुमची पत्रकार परिषद पाहिली. जे मी म्हटलं आणि जो अर्थ तुम्ही लावला तो आश्चर्यकारक आहे. मी सध्या परदेशात शुटिंग करत असून परत आल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तोपर्यंत तुम्ही जर माझे आधीचे ट्विट पाहिले आणि ते समजून घेतले तर बरं होईल".