काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 2013 मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांच्यासारख्या दोषी नेत्यांना अपात्र होण्यापासून वाचवण्यासाठी तत्कालीन युपीए सरकारने आणलेला अध्यादेश फाडून टाकला होता. त्यांच्या या कृत्यामुळे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी नाराज झाले होते. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपलं आगामी पुस्तक 'In Pranab, My Father: A Daughter Remembers' यावर चर्चा केली. या पुस्तकात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांबद्दल काही किस्से आणि खासगी गोष्टी सांगितल्या आहेत. 


राहुल गांधींचं बोलणं "राजकीयदृष्ट्या अपरिपक्व" असल्याचं प्रणव मुखर्जी यांना वाटत होतं. राहुल गांधी आकलनशक्तीची लढाई हारत आहेत असंही त्यांना वाटत होतं अशी माहिती शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिली आहे. तसंच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी संसदेतील अनुपस्थित राहत असल्याने प्रणब मुखर्जी नाराज होते अशीही माहिती त्यांनी दिली. 


वडिलांनी एका मुलाखतीत सोनिया गांधी आपल्याला पंतप्रधान करतील अशी कोणतीही अपेक्षा नसल्याचं सांगितलं असल्याचा खुलासा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केला आहे. "2004 मध्ये सोनिया गांधींनी माघार घेतल्यानंतर पंतप्रधान कोण होणार याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. मनमोहन सिंग आणि माझ्या वडिलांचं नाव यात होतं. मी त्यांना उत्साहीपणे तुम्ही आता पंतप्रधान होणार का असं विचारलं होतं. त्यावर त्यांनी नाही, मनमोहन सिंग होतील असं उत्तर दिलं होतं," अशी माहिती शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिली.


शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितलं की, वडिलांनी डायरीत एका घटनेची नोंद केली आहे ज्यामध्ये 2009 सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत मी आघाडी सरकारच्या बाजूने नाही असं सांगितलं होतं. राहुल गांधींनी सुसंगतपणे आपले विचार मांडावेत असं बाबा म्हणाले होते. त्यावर राहुल गांधींनी मी तुमची भेट घेईन सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान युपीए सरकारच्या 2004 ते 2014 च्या कार्यकाळात दोन्ही नेत्यांमध्ये फार चर्चा होत नव्हती अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


शर्मिष्ठा मुखर्जी यांनी यावेळी एका घटनेची माहिती दिली, ज्यामध्ये प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान होण्याची आशा असलेल्या राहुल गांधींवर उपहासात्मक भाष्य केलं होतं. "बाबा सकाळी मुघल गार्डनमध्ये चालत असताना राहुल गांधी त्यांना भेटायला आले होते. त्यांना चालताना आणि पूजा करताना व्यत्यय आणलेलं आवडत नसे. पण तरीही त्यांनी भेट घेतली. नंतर मला समजलं की, राहुल गांधी त्यांना संध्याकाळी भेटणं अपेक्षित होतं," असं त्यांनी सांगितलं.


"जेव्हा मी बाबांना याबद्दल सांगितलं, तेव्हा ते संतापले नाहीत. जे उपाहासात्मकपणे म्हणाले की, जर राहुल गांधीच्या कार्यालयाला AM आणि PM यातील फरक कळत नसेल तर ते पंतप्रधान कसे होतील?," असं शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या.