नवी दिल्ली : २०१९ च्या निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांच्या संस्थेनं केलेल्या सर्व्हेचे आकडे समोर आले आहेत. या सर्व्हेनुसार देशामध्ये मोदी लाट कायम आहे. या सर्व्हेमध्ये ४८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर ११ टक्के लोकांच्या पसंतीसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रशांत किशोर यांची संस्था अॅडव्होकसी ग्रुप इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमेटी (आय-पीएसी)नं हा सर्व्हे केला आहे. आय-पीएसीच्या या सर्व्हेमध्ये एकूण ९२९ नेत्यांपैकी स्वत:च्या आवडत्या नेत्याची निवड करायची होती. ७१२ जिल्ह्यांमधल्या ५७ लाख लोकांनी या ऑनलाईन सर्व्हेमध्ये भाग घेतल्याचा दावा आय-पीएसीनं केला आहे.


तिसऱ्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व्हेमध्ये ९.३ टक्के पसंतीसह अरविंद केजरीवाल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सपा नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना ७ टक्के, मायावतींना ४.२ टक्के आणि ममता बॅनर्जींना ४.१ टक्के मतं मिळाली आहेत. या सर्व्हेमध्ये शरद पवार, नवीन पटनायक, नितीश कुमार, सीताराम येचुरी या नेत्यांचाही समावेश करण्यात आला होता.


मुख्य मुद्दे


या सर्व्हेमध्ये देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही विचारण्यात आलं होतं. शेतकऱ्यांची समस्या, आर्थिक असमानता, महिला सशक्तीकरण, आरोग्य सेवांमधली कमी, सांप्रदायिक एकता, विद्यार्थ्यांच्या समस्या हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचं लोकांनी सांगितलं.


सर्व्हेवर आक्षेप


आय-पीएसीनं केलेल्या या सर्व्हेवर आक्षेप घेण्यात येत आहेत. हा सर्व्हे ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये ग्रामीण भारताला प्रतिनिधीत्व मिळालं नसल्याचं बोललं जात आहे.


याआधी २०१३ साली प्रशांत किशोर जोडले गेले असलेल्या सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्सनंही असाच एक सर्व्हे केला होता. त्यावेळच्या सर्व्हेमध्येही मोदीच सगळ्यात लोकप्रिय असल्याचं समोर आलं होतं. प्रशांत किशोर हे २०१४ साली भाजपचे निवडणूक रणनितीकार होते. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहूमत मिळालं होतं. यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेसचे रणनितीकार होते. पण या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.