नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांनुसार, 'आम आदमी पक्ष'ने (आप) बहुमताकडे वाटचाल केली आहे. 'आप' पुन्हा एकदा बहुमत मिळवून सत्तास्थापन करणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी दिल्लीतील 'आप'च्या कार्यालयात अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. प्रशांत किशोर यांनी निवडणूकांच्या निकालानंतर दिल्लीकरांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत किशोर यांनी ट्विट करत, भारताच्या आत्म्याच्या रक्षणासाठी उभे राहिल्याबद्दल दिल्लीचे, दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर हे दिल्लीतील 'आप'च्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. 



काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांची संयुक्त जनता दलातून (जेडीयू) हकालपट्टी करण्यात आली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) मुद्द्यावरून प्रशांत किशोर यांनी सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेतली होती. मात्र, बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप हे एकत्र सत्तेत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांची टीका 'जेडीयू'साठी अडचणीची ठरत होती.



बिहार विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, यासाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव निर्माण झाला होता. यानंतर प्रशांत किशोर यांनी CAA च्या मुद्द्यावरून थेट नितीश कुमार यांना लक्ष्य केल्याने त्यांची 'जेडीयू'तून हकालपट्टी झाली होती.