अन्यथा भाजप 30 वर्षे सत्ता भोगेल; प्रशांत किशोर यांचे भाकित
तर पुढील अनेक दशकं देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम राहिल
दिल्ली: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी देशातील विरोधी पक्षांना इशार दिला आहे. योग्य रणनिती आखली नाही; तर पुढील अनेक दशकं देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम राहिल. असं भाकित प्रशांत किशोर यांनी वर्तवलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तर भाजपला कुणीही हटवू शकत नाही
प्रशांत किशोर म्हणाले, " ज्यांना वाटतं की, भाजप ज्या वेगाने वर गेलंय त्याच वेगाने खाली येईल. पण असं लगेच होणार नाही. राष्ट्रीय पातळीवर एका पक्षाला जर 30 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली; तर त्याला लवकर सत्तेतून खाली उतरवणं अशक्य होईल". प्रशांत किशोर यांच्या या भाकितामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विरोधी पक्ष विभागलेला असणं हे मजबूत पक्षाच्या फायद्याचं
प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये एका मुद्द्याकडे विशेष लक्ष जातं ते म्हणजे विरोधीपक्षांत एक मत नसणे. प्रशांत किशोर म्हणाले की, " भारताच्या राजकारणामध्ये 1977 चा अपवाद वगळता दीर्घकाळ सत्तेमध्ये काँग्रेस होती. या कालावधीत काँग्रेसला कडवं आव्हान देणारा एक सुद्धा पक्ष राष्ट्रीय स्तरावर नव्हता. विशेष म्हणजे त्या काळात विरोधी पक्षांची एकजूट नव्हती. तशीच काहीशी परिस्थिती आता आहे. विरोधी पक्ष विभागलेला आहे. त्यांच्यात एकमत नाही. जेव्हा विरोधी पक्ष एकजूट नसतो किंवा तो एकत्रित येण्याच्या तयारीत असतो शक्तीशाली पक्ष सत्तेत राहण्याचा कालावधी मोठा असू शकतो".
भाजप 20-30 वर्ष सत्तेतून जाणार नाही.
"भाजप विरोधी पक्ष असावा असं वाटल्याने भाजप सत्तेतून जाईल असं होणार नाही. हा फक्त एक विचार आहे. योग्य दिशेनं गेल्यास 2 वर्षात एक मजबूत विरोधीपक्ष तयार होऊ शकेल. जर योग्य कृतीच केली नाही तर भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यास विरोधकांना मोठा कालावधी लागू शकतो"