इंदौर: आगामी लोकसभा निवडणुकीत आमची सत्ता आल्यानंतर एका आठवड्यात राम मंदिराचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश देऊ, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले. ते मंगळवारी इंदौर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. तोगडिया यांनी या पक्षाचे नाव अजून जाहीर केले नसले तरी निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघात आमचे उमेदवार निवडणूक लढवतील. या निवडणुकांमध्ये विजयी होऊन सत्तेत आल्यास आमचे सरकार एका आठवड्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी अध्यादेश काढेल, असे आश्वासन तोगडिया यांनी दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तोगडिया यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी म्हटले की, ग्रामपंचायतीपासून ते केंद्र स्तरावर सत्ता येऊनही भाजपने राम मंदिर उभारले नाही. अनेक वर्षांपूर्वी भाजपने हिंदुंना राम मंदिर उभारण्याचे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्यात भाजपला अपयश आले आहे. काँग्रेस तर कधीच राम मंदिर उभारणार नाही. मात्र, आमचा पक्ष राम मंदिराबाबत हिंदुंचा भ्रमनिरास करणार नाही, असे त्यांनी सांगितले. 


यावेळी तोगडिया यांनी आपल्या पक्षाचे धोरणही स्पष्ट केले. आमचा पक्ष सत्तेत आल्यास कोणत्याही जोडप्याला दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देण्यावर बंदी घातली जाईल. जेणेकरून देशाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे शक्य होईल. या नियमाचे पालन न करणाऱ्यांना शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक योजनांचा लाभ मिळणार नाही, असे तोगडिया यांनी स्पष्ट केले.