तिरुवनंतपुरम : केरळमधून अतिशय संतापजनक बाब समोर आली आहे. बुधवारी एका गर्भवती हत्तीणीचा ती पाण्यात उभी असतानाच मृत्यू झाला आहे. केरळच्या या हत्तीणीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमागे अतिशय संतापजनक कृत्य असून सोशल मीडियावर याबाबत तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये बुधवारी एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. ही हत्तीण जंगलातून खाण्याच्या शोधात एका गावात रस्त्यावर आली. त्यावेळी तिला काही लोकांनी अननसातून फटाके खायला दिले आणि या आईची मनुष्य प्राण्यानेच निर्घुण हत्या केली. अननसाचं केवळ आवरण होतं आणि त्या आत फटाके ठेवण्यात आले होते. हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला. 


हत्तीणीच्या तोंडात स्फोट झाल्यानंतर तोंडातील दाह, आग शांत करण्यासाठी ती वेल्लियार नदीच्या पाण्यात गेली आणि तिथेच उभी राहिली. तिच्या संपूर्ण जबड्यात जखमा झाल्या होत्या. हत्तीणीने तिचं तोंड, सोंड पाण्यातच बुडवून ठेवलं होतं. 


वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तीणीबाबत माहिती समजल्यानंतर तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु करण्यात आलं. त्यासाठी दोन हत्तींची मदत घेण्यात आली होती. मात्र हत्तीण बाहेर येण्यास तयारच नव्हती. अनेक तासांपर्यंत बचाव कार्य सुरु होतं, परंतु त्याचा फायदा झाला नाही. अखेर 27 मे रोजी तिचा दुर्देवी मृत्यू झाला. हत्तीणीच्या मृत्यूनंतर तिला बाहेर काढून ट्रकमध्ये ठेवण्यात आलं आणि जंगलात नेलं. तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


केरळचे वनाधिकारी कृष्णन यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी केलेल्या पोस्टनंतर या हत्तीणीबाबतची माहिती सर्वांसमोर आली. माणसाकडून करण्यात आलेल्या या निर्घुण कृत्यानंतर मोठा संताप व्यक्त होत आहे.