८ महिन्यांच्या गर्भवती महिलेला ६ रुग्णालयांमध्ये भरती करण्यास नकार; रुग्णालयांच्या गलथान कारभाराचा बळी
आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेची तब्येत अचानक बिघडली...
गाझियाबाद : कोरोना संकटाच्या काळात इतर अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. उपचार न मिळाल्याने एका आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गाझियाबादच्या खोडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात भरती करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली. परंतु कोणत्याच रुग्णालयात महिलेला भरती करुन घेण्यात येत नव्हतं. सकाळपासून निघालेल्या महिलेला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात अशा 6 रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं. परंतु एकही रुग्णालय भरती करुन घेण्यास तयार नव्हतं. या सगळ्या प्रकारात महिलेची तब्येत आणखी बिघडली आणि त्यातच तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
मृत महिलेल्या कुटुंबियांनी, नोएडातील 6 रुग्णालयांमध्ये महिलेला नेण्यात आलं परंतु एकाही रुग्णालयाने भरती करुन घेतलं नसल्याचा आरोप केला आहे. महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. महिलेसह तिच्या पोटातील बाळाचाही यात मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनाची लक्षणं असल्याचंही माहिती मिळत आहे.
नोएडातील जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीही केस रुग्णालयात आली नसल्याचं सांगत आरोप झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याबाबतही सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.