प्रेमकुमार धूमल करणार मुख्यमंत्री पदाची हॅट्ट्रीक?
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला. या हालचालीत भाजपने पहिली चाल खेळत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही जाहीर केला. भाजपच्या चालीवर विरोधी पक्ष कसा पलटावर करतात याबाबत उत्सुकता आहे.
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला. या हालचालीत भाजपने पहिली चाल खेळत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही जाहीर केला. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून भाजपने प्रेमकुमार धूमल यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा माळ घातली. भाजपच्या चालीवर विरोधी पक्ष कसा पलटावर करतात याबाबत उत्सुकता आहे. परंतू, त्याही पेक्षा उत्सुकता ही की, प्रेमकुमार धूमल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून विजयाची हॅट्ट्रीक करणार का?
हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रेम कुमार धूमल यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी धूमल यांच्या नावाची घोषणा केली. धूमल हे यापूर्वी दोन वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी यापूर्वी एका प्रतिक्रियेत सांगितले होते की, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाही. प्रत्येक राज्या-राज्यांदरम्यान पक्षाची वेगळी रणनीती असते. त्यानुसारच पक्षाचा कार्यक्रम चालतो. मात्र, पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला.
कोण आहेत प्रेम कुमार धूमल?
प्रेम कुमार धुमल हे सध्या ७३ वर्षांचे आहेत. ते गेली अनेक वर्षे हिमाचल प्रदेशमधील हमीरपुर येथून विधानसभा निवडणूक लढवत आले आहेत. १९८४ मध्ये धूमल यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, १९८९मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी हमीरपुर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर अटल बिहारी वाजपेई यांनी त्यांना हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष केले. १९९६मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. भाजप आणि विकास कॉंग्रेस यांच्यात झालेल्या आघाडीत त्यांना पहिल्यांदा हिमाचर प्रदेशचा कारभार सांभाळण्याची संधी मिळाली. मार्च १९९८ ते मार्च २००३ पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर २००७ ते २०१२ पर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.