कोरोना व्हायरस प्रभावित भारतीयांना चीनमधून बाहेर काढण्याची तयारी
चीनमधून प्रवास करणाऱ्या जवळपास ३३ हजार ५५२ प्रवाशांची आत्तापर्यंत तपासणी
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरस प्रभावित वुहानमधून भारतीय लोकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सरकारनं हुबेईच्या कोरोना व्हायरस प्रभावित चीनच्या प्रांतातील वुहान शहरातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल सेंटर उभारण्यात आले आहेत. १५५ उड्डाणांमधील चीनमधून प्रवास करणाऱ्या जवळपास ३३ हजार ५५२ प्रवाशांची आत्तापर्यंत तपासणी करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये कोरोना व्हायरससंदर्भात आरोग्य विभागानं सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जॉली ग्रांट, पंतनगर आणि पिथौरागढ एअरपोर्टवर विशेष नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच उत्तराखंड आणि नेपाळच्या सीमेवर आरोग्य विभागाची एका टीमला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.
कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा वाढत चालला आहे. चीनमध्ये आतापर्यंत १०६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १३०० संशयित आढळून आले आहेत. चीनमधून कोरोना व्हायरस दुसऱ्या देशात देखील पाय पसरवत आहे. अमेरिका, हाँगकाँग, मकाऊ, तैईवान आणि भारतानंतर श्रीलंकेमध्ये ही कोरोना व्हायरसचे संशयित आढळले आहेत.
सोमवारी चीनचे पतप्रधान ली केकियांग यांनी या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्या विभागाच्या लोकांसोबत बैठक घेतली. चीनमधून इतर देशांमध्ये येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. सर्वच देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.