राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचं आमंत्रण, `या` तारखेला शपथविधी; मोदी म्हणाले...
President invites Narendra Modi to form government : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.
Narendra Modi meet President : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं होतं. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले आणि शपथविधीची तारीख देखील सांगितली. राष्ट्रपती भवनाबाहेर माध्यमांना संबोधित करताना त्यांनी जनतेचे आभार मानत आश्वसन दिलं आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
जनतेने मला तिसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी दिली. लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आज सकाळी एनडीएची बैठक झालीय. त्यामध्ये आमच्या एनडीएच्या सहकाऱ्यांनी माझी निवड केली. एनडीएच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रपतींना याची कल्पना दिली. त्यानंतर मला राष्ट्रपतींनी मला पंतप्रधान म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. आम्ही त्यांना सांगितलं आहे की, येत्या 9 तारखेला शपथविधी योग्य राहिल, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलंय.
गेल्या 10 वर्षात आम्ही खूप चांगलं काम केलंय. देशभरात आणि जगातील अनेक संकटांना आपण सामोरं गेलोय. जगात भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत आहे. अर्थव्यवस्था अधिक बळकच होत आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचं पत्र दिलं आहे. तसेच त्यांनी मंत्र्यांची यादी देखील मागवली आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. त्याआधी एनडीएच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडला आणि एनडीएच्या खासदारांनी त्याला अनुमोदन दिलं. त्यानंतर नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची यादी राष्ट्रपतींना सादर करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर जोशी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. NDA आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते, तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, मोदी दुपारी आधी अडवाणी आणि त्यानंतर जोशींच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. राष्ट्रपतींना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी मोदींनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली.