देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री तिसऱ्या रांगेत, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पहिल्या रांगेत
राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राला मान, दिल्लीत फडणवीस यांचं महत्त्व वाढलं
नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेतली. दिल्लीतील संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुर्मू यांना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) एन. व्ही. रमणा (N V Ramana) यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील अनेक मान्यवर आणि सर्व राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पहिल्या रांगेत विराजमान होते. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मात्र तिस-या रांगेत बसले होते.
पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राजनाथ सिंह, अमित शाह, जे. पी. नड्डा, मुरली मनोहर जोशी, सोनिया गांधी, नवीन पटनायक यांच्यासह एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बसले होते. उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना पहिल्या रांगेत स्थान मिळाल्यानं भाजपमधील त्यांचं राष्ट्रीय पातळीवरील महत्त्व यानिमित्तानं दिसून आलं.
दिल्लीवरुन वॉच
राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं, तसंच मी मंत्रिमंडळात असणार नाही,असंही स्पष्ट केलं. पण काही वेळातच चक्र फिरली आणि थेट केंद्रातून उपमुख्यमंत्री बनण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हे आदेश दिले.
महाराष्ट्रात फडणवीस यांची राजकीय ताकद दिवसागणिक वाढत आहे. हे वाढते प्राबल्य केंद्रासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे फडणवीस यांचे राजकीय पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा होती. पण आता शपथविधी सोहळ्यात फडणवीस यांना पहिल्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व वाढल्याची चर्चा आहे.