नवी दिल्ली :  देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये रामनाथ कोविंद विजयी झालेत. संसद भवनात आज सकाळपासून  मतमोजणी सुरु होती. यामध्ये कोविंद यांना ६५.३४ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली.


या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. रामनाथ कोविंद यांना ७ लाख २ हजार ४४ मतं मिळाली. तर यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मतं मिळाली. कोविंद यांना मीरा कुमार यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट मतं मिळाली.


रामनाथ कोविंद यांचा भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून २५ जुलैला संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथविधी होणार आहे. आपल्यासाठी हा अत्यंत भावूक क्षण असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर रामनाथ कोविंद यांनी दिली. तर पराभव झाला असला तरी ही विचारांची लढाई अशीच सुरू राहणार असल्याचा निर्धार यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांनी व्यक्त केला.