TRAI ने बदलेले नियम आजपासून लागू, इथे मिळेल सर्व प्रश्नांचे उत्तर
युजर्स आपल्या आवडीचे चॅनल निवडू शकतात.
नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्यूलेटरी एथोरीटी ऑफ इंडिया (TRAI) ने DTH आणि केबल ऑपरेटर्ससाठी बनवलेले फ्रेमवर्क आजपासून लागू झाले आहे. यानुसार युजर्स आपल्या आवडीचे चॅनल निवडू शकतात. जितके चॅनल्य युजर्सना पाहायचे आहेत तितक्यांचेच पैसे त्यांना मोजावे लागणार आहेत. याशिवाय DTH प्रोवाइडर्स जसे की Airtel Digital TV, Dish TV, Tata Sky यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर चॅनल्सची लिस्ट देखील जाहीर केली आहे. यूजर्स वेगवेगळे चॅनल्स निवडून पॅक घेऊ शकतात किंवा प्रोवाईडर्सने दिलेले पॅक अॅक्टीवेट करु शकतात. पण तुम्ही प्रोवाईडर्सने दिलेले पॅक्स किंवा तुमच्या पद्धतीने चॅनल्स सिलेक्ट केले नसतील तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. TRAI ने दिलेल्या माहितीनुसार युजर्सनी अजूनही कोणते पॅक सुरू केले नसेल तरी त्यांची सर्विस पूर्णपणे बंद होणार नाही. पण काही चॅनल्स त्यांना दाखवले जाणार नाहीत.
अजूनही कोणत्या युजर्सने प्लान एक्टीवेट केले नसेल तर युजर्सच्या अकाऊंटवर एक पॅक अॅक्टीवेट केले जाईल. या पॅकची किंमत त्यांच्या जुन्या पॅकच्या जवळपास असेल. युजर्सच्या सर्व्हीसमध्ये कोणतीही बाधा येणार नाही असे Airtel ने स्पष्ट केले.
TRAI च्या प्रसिद्धी पत्रकानुसार, ब्रॉडकास्टर टीव्हीद्वारे युजर्सना चॅनल्स सिलेक्ट करण्याची माहिती देत आहेत. TRAI ने ब्रॉडकास्टर्सना प्रत्येक चॅनल सोबत त्याची किंमत दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. चॅनलच्या किंमतीपेक्षा वेगळ्या सर्व्हिस घेणाऱ्या युजर्सना मुळ किंमत द्यावी लागणार आहे.
ही मुळ किंमत 100 रुपये असून यामध्ये 25 चॅनल्स दिले गेले आहेत. हे सर्व सरकारी चॅनल्स आहेत. मुळ किंमत जास्तीत जास्त 130 रुपये ( प्लस टॅक्स) असू शकते. वेगवेगळ्या ऑपरेटर्सनुसार ही मुळ किंमत वेगवेगळी असू शकते.