नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांतीचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत ठेवण्यात आला आहे. भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा तणाव दूर करण्यासाठी इम्रान खान यांनी जी काही पाऊलं उचलली त्यावर लक्ष केंद्रित करत पाकिस्तानातून ही मागणी करण्यात येत आहे. याच मागणीच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या संसदेत एक प्रस्ताव ठेवण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेच्या सचिवालयात याविषयीचा प्रस्ताव ठेवला. त्यात नमूद केल्यानुसार भारतीय वायुदल अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पुन्हा भारताकडे सोपवण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमध्ये असणारा तणाव दूर झाला. त्यामुळे या जबाबदार भूमिकेसाठी त्यांना शांतीपूर्ण वातावरणासाठी काम केल्याचं नोबेल पारितोषिक देण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या संसदीय सत्रात या प्रस्तावावर विचार केली जाण्याची शक्यता आहे. 


इम्रान खान यांना नोबेल पारितोषिक देण्याच्या या प्रस्तावाचे पाकिस्तानच्या संसदेत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सतत रडीचा डाव खेळणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं सतत बदलणारी वक्तव्य पाहता सोशल मीडियावर त्यांच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक आणि परतवून लावलेली पाकिस्तानची घुसखोरी पाहता आम्हाला युद्ध नको असं म्हणणाऱ्या खान यांची अवघ्या काही तासांमध्ये नरमलेली भाषा अनेकांसाठी धक्काच होती. आंतरराष्ट्रीय राजकारणातही सध्या याविषयीच्याच चर्चा रंगत आहेत. 


जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दहशतवादी संघटनांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या या भूमिकेबद्दल इतर राष्ट्रांकडूनही ताकिद देण्यात आली होती. ज्यानंतर पुलवामा हल्ल्याचं सडेतोड उत्तर देत भारताडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात बालाकोट परिसरात असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला होता. ज्यामध्ये जैशचे अनेक महत्त्वाचे मोहरे मारले गेले होते.