मुंबई : शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आजच्या विस्तारात सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यापुढे होणा-या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळाला मोदींनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करीत म्हटलं की,  'महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा'.



आज शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आजच्या विस्तारात सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून आज राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजय कुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांची प्रथमच मंत्रीपदी वर्णी लागलीय.