माले : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आज मालदीव देशात दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. शेजारी प्रथम या धोरणांतर्गत, शेजारील राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने मोदींचा हा परदेश दौरा आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमाराला मोदी माले विमानतळावर उतरले. मालदिवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना लष्करी मानवंदना देण्यात आली. नरेंद्र मोदींचे मालदिवमध्ये पारंपारिकरित्या स्वागत करण्यात आले. मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'निशान इज्‍जुद्दीन'ने मोदींना सन्मानित करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींना 'द मोस्ट ऑनरेबल ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्वीश रुल ऑफ निशान इज्जुदीन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालदिवचे राष्ट्रपती अब्दुल्ला सालिह यांनी ही घोषणा केली. परेदेशातील मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आल्यानंतर 'हा सन्मान मिळाल्याचा अतिशय अभिमान वाटत असल्याचे' त्यांनी म्हटले आहे. 'हा केवळ माझा सन्मान नाही तर या दोन्ही देशातील मैत्री आणि संबंधांचा सन्मान आहे. मालदीव आणि भारताची मैत्री अमर राहो' असेही मोदींनी म्हटलं. 





मोदी मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत जवळपास १० देशांच्या संसदेत संबोधित केले आहे. यामध्ये मॉरिशस आणि नेपाळसाकख्या देशांचाही समावेश आहे.