लखनऊ : देशभरात सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. राजकारण्यांच्या प्रचार सभांना देखील जोर आला आहे. युती- आघाडीची सूत्रही वेगाने हलू लागली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार सभा आणि नव्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा झंझावातही सुरू आहे. पण कानपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांची मात्र वेगळीच लगबग सुरू आहे. ते सध्या एक खुर्ची दुरुस्ती करण्याच्या मागे लागले आहेत. कारण ही खुर्ची पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाग्यशाली खुर्ची ठरली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षाहून जास्त काळ ही लाकडी खुर्ची काचेच्या बॉक्समध्येच होती. निवडणुकीत ही खुर्ची भाजपासाठी शुभ लाभ मानली जाते. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी या खुर्चीवर बसले आहेत तेव्हा तेव्हा भाजपाने कानपूर जवळच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. राज्य आणि केंद्रातही भाजपाला चांगले यश मिळाले. हे सर्व या शुभ खुर्चीमुळे झाल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी पुन्हा या खुर्चीवर बसावे आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये आपली पहिली निवडणूक विजय शंखनाद रॅली 19 ऑक्टोबर 2013 ला काढली होती. त्यावेळी पहिल्यांदाच ते या शुभ मानल्या जाणाऱ्या खुर्चीवर बसले होते. त्यानंतर एप्रिल 2014 मध्ये कोयला नगरच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांची रॅली पुन्हा कानपूरच्या कोयला नगर मैदानात झाली आणि मोदी पुन्हा या खुर्चीवर बसले. यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. भारतीय जनता पार्टीच्या कानपूर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र मैथानी यांनी यासंदर्भात माहिती दिली.


यूपी निवडणुकीतही खुर्ची 



या खुर्चीची किमया उत्तर प्रदेश निवडणुकीतही पाहायला मिळाल्याचे मैथानी सांगतात. 2016 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी निराला नगरच्या मैदानात झालेल्या प्रचार सभेत या खुर्चीवर बसले होते. 2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सरकार बहुमताने निवडून आले. जेव्हा मोदी या खुर्चीवर बसतात तेव्हा राज्य सरकारला मोठे यश मिळते असे भाजपा पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे रॅलीसाठी ही खुर्ची बनवणाऱ्या डिलर कडून ती विकत घेतली. त्यानंतर भाजपा कार्यलयात ती काचेच्या बॉक्समध्ये सुरक्षीत ठेवण्यात आली.