नवी दिल्ली : दिल्लीत रामलीला मैदानावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला दहशतवाद्यांचा धोका असल्याची माहिती मिळत आहे. गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना याबाबत सतर्क केलं आहे. अनधिकृत वसाहतींना नियमित करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजप ही सभा घेत आहे. या सभेला मोदी संबोधित करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सभेसाठी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या रॅलीमध्ये दीड लाख सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या १ हजार ७३४ अनधिकृत वसाहती एका विधेयकाद्वारे नियमित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास ४० लाख लोकांना त्यांच्या संपत्तीचा हक्क मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी भाजपने या रॅलीचं आयोजन केलं आहे. 


नागरिकत्व संशोधन कायदा, राम जन्मभूमी आणि कलम ३७० हटवल्यामुळे दहशतवाद्यांचं पित्त खवळलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत असं गुप्तचर यंत्रणेचं म्हणणं आहे. त्यामुळे रॅलीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना सतर्क केलं आहे. रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. तसंच रॅलीच्या सुरक्षेसाठी इमारतींवर विशेष सुरक्षारक्षक तैनात असतील. 


शनिवारी पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. ही बैठक तब्बल साडे आठ तास सुरु होती. मात्र बैठकीत एनआरसी आणि सीएएबाबत कोणतीच चर्चा झाली  नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० मे रोजी ५७ मंत्र्यांसह शपथ घेत आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केली होती. त्यावेळी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी गेल्या सहा महिन्यांच्या सरकारच्या कामागिरीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व मंत्र्यांना आपलं रिपोर्ट कार्ड सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 


मोदी सरकार दोनच्या गेल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळातील दुसरी बैठक घेण्यात आली. रिपोर्ट कार्डच्या आधारावर मंत्र्यांचं मंत्रिमंडळात भवितव्य ठरणार असल्याने ही बैठक म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीची तयारी मानली जात आहे.