...म्हणून पीएम मोदींनी झोपडीत राहणाऱ्या या आजीचे मानले आभार
मोदींनी ट्विटरवर एक ट्विट रिट्विट केलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विटरवर एक ट्विट रिट्विट केलं आहे. पंतप्रधानांनी ज्या ट्विटला रिट्विट केलंय, त्यात एक वृद्ध महिला, आजी आपल्या झोपडीवजा घराबाहेर थाळी वाजवताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी या वृद्ध महिलेला कोरोनाविरुद्ध लढा देण्यास समर्थन दिल्याने धन्यवाद दिले आहेत. 'या आईच्या भावनांचा आदर करुया आणि घरातच राहुया. हाच संदेश त्या देत आहेत' असं म्हणत मोदींनी त्या वृद्ध महिलेचे आभार मानले आहेत.
22 मार्च रोजी रविवारी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला 'जनता कर्फ्यू'चं आवाहन करण्यात आलं होतं. 'जनता कर्फ्यू' सकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेपर्यंत सुरु होता. या 'जनता कर्फ्यू'मध्ये पंतप्रधानांनी संध्याकाळी 5 वाजता, 5 मिनिटांपर्यंत आपल्या घराच्या खिडकीत, दरवाज्यात उभं राहून थाळी, घंटी, टाळ्या वाजवून संपूर्ण जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस, मीडिया, सफाई कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी या आजीनेही स्वत:च्या घराबाहेर बसून अशा कठीण काळात आपली मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 492वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व रुग्णांपैकी 34 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर, संपूर्ण जगभरात जवळपास 3 लाख 80 हजारहून अधिक कोरोनाग्रस्त लोक आहेत. त्यापैकी 16,497 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. भारतातील अनेक राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र असं असतानाही जनतेकडून मात्र याबाबत तितकंस गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचं चित्र आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना रस्त्यांवरुन प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र अनेक लोक संचारबंदी असतानाही विनाकारण किंवा तितकंस महत्त्वाचं काम नसतानाही बाहेर फिरताना दिसतात. आज रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत.