`नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही धर्माला धक्का लागणार नाही`
CAA मुद्द्यावरुन भडकलेल्या हिंसाचारावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : नागरिकता सुधारणा कायद्यावरुन देशभरात सुरु असणाऱ्या विविध हिंसात्मक घटना आणि विरोधी आंदोलनांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 'देशभरात नागरिकता सुधारणा कायद्यावरुन होणारी हिंसा आणि विरोध हा दुर्दैवी आहे', असं त्यांनी म्हटलं आहे.
कोणत्याही विषयावरील चर्चा, विचारविनिमय किंवा असहमती हे लोकशाहिचे विविध भाग आहेत. पण, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं किंवा सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत करणं, त्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवणं याची शिकवण आपल्याला संस्कृतीतून कधीच मिळालेली नाही', असं ट्विट त्यांनी केलं.
वाचा : जामिया विद्यापीठातील आंदोलनावर अक्षय कुमार म्हणाला...
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नागरिकता सुधारणा विधेयकाला समर्थन मिळालं, त्यानंतरच राजकीय पक्षांनी या विधेयकाला मंजुरी देण्याचा मार्ग मोकळा केला. स्वीकारार्हता, बांधिलकी, सदभाव, प्रेम अशा भारताच्या कित्येक वर्षांपासूनच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणजे हा कायदा आहे, असं म्हणत मोदींनी CAA मुद्द्यावरील काही गोष्टी स्पष्ट केल्या.
सध्याच्या घडीला देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या CAB मुद्द्यावरुन सुरु असणाऱ्या घटनांविषयी आणि काही समजुतींविषयी सांगताना मोदींनी देशातील कोणत्याही धर्माला मानणारा कोणताही व्यक्ती या कायद्यामुळे प्रभावित होणार नसल्याचं सांगितलं. 'हा कायदा फक्त त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी वर्षानुवर्षे बाहेर अत्याचार सहन केला आहे आणि ज्यांना भारतात येण्यावाचून दुसरा कोणताही परिणाम नव्हता', असं ट्विट मोदींनी केलं. कोणालाही आपल्या देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यास आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळणार नसल्याचं म्हणत त्यांनी हिंसाचार भडकवणाऱ्यांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरु असणारा हिंसाचार आणि त्यामुळे देशाती काही वर्गांमध्ये असणाऱा असंतोष पाहता साऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.