ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असतील प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवामध्ये होणार सहभागी
नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केले आहे. जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. बोरिस जॉन्सन हे 26 जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवामध्ये सहभागी होतील. मंगळवारी ब्रिटीश परराष्ट्र सचिवांनी याची घोषणा केली.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जॉन्सन यांच्या कार्यालयाने त्यांचे निवेदन प्रसिद्ध केले होते, ज्यात त्यांनी भारतात येण्याबद्दल उत्साह व्यक्त केला होता. एका अधिकृत निवेदनात ते म्हणाले की, 'पुढच्या वर्षी भारतात जाऊन मला आनंद होईल. ग्लोबल ब्रिटनसाठी ही एक उत्साहवर्धक वर्षाची सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्याचे आश्वासन पूर्ण करण्यास मी उत्सुक आहे.
बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनचा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल. यासह, भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक दिनी भारताचे सन्माननीय अतिथी होणारे ते दुसरे ब्रिटीश नेते असतील. यापूर्वी 1993 मध्ये जॉन मेजर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, 'देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण स्वीकारणे हे भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंधांमध्ये नवीन युगाचा पर्व असेल.'
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत प्रत्येक वेळी परराष्ट्र प्रमुख आणि अतिथींना आमंत्रित करतो, परंतु यावेळी कोरोना व्हायरसमुळे सर्व काही बदलले आहे. स्वातंत्र्य दिन खूप साधेपणाने आणि मोठ्या बदलांसह साजरा करण्यात आला होता. त्यामुळे प्रजासत्ताक दिन देखील काही नियमांसह आणि साधेपणाने साजरा होण्याची शक्यता आहे.