रेल्वेमध्ये खासगीकरण, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवले
भारतीय रेल्वेने (Indian Railway) बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
मुंबई : भारतीय रेल्वेने (Indian Railway) बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. १०९ मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक १५१ रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यातून भारतीय रेल्वेला ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या योजनेद्वारे प्रथमच प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्यात येत आहे. रोजगार निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने खासगी क्षेत्राला रेल्वेने आमंत्रित करण्यात आले आहे. प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवास देण्याबरोबर यातून रोजगार निर्मितीही होईल. दरम्यान, गतीवर्षी भारतीय रेल्वेने RCTC च्या माध्यमातून लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही आलिशान प्रवासी गाडी सुरु केली आहे.
काय आहे योजना ?
१५० अत्याधुनिक रेल्वेगाड्या यासाठी वापरण्यात येतील. यातल्या बहुतेक गाड्यांची निर्मिती भारतात झालेली आहे. प्रत्येक गाडीला किमान १६ डबे असतील. ताशी १६० किमी वेगाने धावणाऱ्या या गाड्या असतील. त्या त्या मार्गावरच्या सर्वांत वेगवान गाडीच्या तुलनेतच या खासगी गाड्यांचा वेग अधिक असेल.
या सर्व खासगी रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेच्या म्हणजे सरकारी लोको पायलट आणि गार्ड्सकडूनच चालवण्यात येतील.
या गाड्यांच्या निर्मितीपासून, देखभाल आदी सेवा पूर्णपणे Make in India अर्थात भारतीय बनावटीच्या असतील. या गाड्यांच्या निर्मितीचा खर्च, दररोजचा खर्च आणि इतर खर्च खासगी संस्था करेल आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि वेगवान प्रवासाची सुविधा निर्माण करणे हा उद्देश यामागे आहे, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.