नवी दिल्ली : दिल्लीतल्या जामिया मिलिया मुस्लीम विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ काँग्रेस सरचिटणी प्रियंका गांधी वाड्रा रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रियंका गांधींनी इंडिया गेटसमोर झालेल्या कॅबविरोधी आंदोलनात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा त्यांनी तीव्र निषेध केला. ए. के. अँटनी, के.सी. वेणूगोपाल यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध कऱणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईच्या विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याविरोधात आज पत्रकार परिषद घेऊन कारवाईचा निषेध केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांना वाचनालय, टॉयलेटमध्ये जाऊन मारहाण केली असा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाचा न्यायालयानी तयास व्हावा अशी मागणी करण्यात आली. पोलीस कुलगुरूंच्या परवानगीशिवाय विद्यापीठात घुसू शकत नाहीत, पोलिसांना कोणी परवानगी दिली होती असा सवाल विचारण्यात आला आहे.


नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून जोरदार आंदोलनाला सुरूवात केली. यावेळी जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. जामिया मिलिया विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबत टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी आहेत अशा अर्थाचे फलक यावेळी झळकावण्यात आले. 


आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण विद्यार्थ्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. विद्यार्थ्यांनी आजपासून वर्गांवर बहिष्कार टाकत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी सकाळी मुंबईच्या रस्त्यावर मोर्चाही काढला.