पाटणा: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. यामध्ये आता राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेत्या राबडी देवी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी म्हटले की, प्रियंका गांधी नरेंद्र मोदी यांना दुर्योधन म्हणून चूक केली. त्यांनी आणखी वेगळी भाषा वापरायला पाहिजे होती. कारण, नरेंद्र मोदी हे तर जल्लाद आहेत. त्यांनी अनेक पत्रकार आणि न्यायाधीशांचे अपहरण केले. त्यांना ठार मारले. अशा व्यक्तीचे विचार किती भयंकर असतील, असे राबडी देवी यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका यांनी मंगळवारी अंबाला येथे झालेल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. प्रियंका यांनी म्हटले होते की, सध्या देशातील जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. आजवरचा इतिहास पाहता या देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. महाभारतामध्ये दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता. श्रीकृष्ण दुर्योधनाची समजूत काढण्यासाठी गेला तेव्हा दुर्योधनाने त्याला पकडायचा प्रयत्न केला. परंतु, श्रीकृष्णाच्या विशाल रुपासमोर दुर्योधनाचा अहंकार नष्ट झाला, असे प्रियंकांनी म्हटले होते. 



प्रियंकांच्या या टीकेला भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्युत्तरही दिले होते. येत्या २३ तारखेला कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन, हे सर्वांना समजेल, असा पलटवार शहा यांनी केला.