`चौकीदार` श्रीमंतांचे असतात, शेतकऱ्यांचे नसतात- प्रियंका गांधी
चौकीदार हे श्रीमंतांचे असतात, आम्ही शेतकरी तर स्वत:ची चौकीदारी स्वत:च करतो. हे उदाहरण देऊन त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
प्रयागराज : काँग्रेस महासचिव आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाराणसी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सिरसा घाट येथे घेतलेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना समर्थन देण्याचे आवाहन केले. सिरसा घाट येथे त्यांनी आपली क्रूज बोट सोडली आणि गेस्ट हाऊसमधील लोकांना संबोधित केले. प्रियंका गांधी यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधला. गेल्या 45 वर्षात जितका रोजगार दर कमी झाला नव्हता तितका दर गेल्या पाच वर्षात झाल्याचे त्यांनी म्हटले. देश यावेळेस संकटात असून मत देऊन देशासोबत स्वत:ला मजबूत बनवा असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदींच्या चौकीदार कॅम्पेनवरही त्यांनी निशाणा साधला आहे.त्यांनी स्वत:च्या नावापुढे काय लिहायचे ही त्यांची (पंतप्रधान मोदी) मर्जी आहे. मला तर एका शेतकऱ्याने म्हटले की चौकीदार हे श्रीमंतांचे असतात, आम्ही शेतकरी तर स्वत:ची चौकीदारी स्वत:च करतो. हे उदाहरण देऊन त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
सिरसा घाट क्षेत्रामध्ये प्रियंका गांधी बोटीतून उतरुन बाजारमध्ये शिवगंगा वाटिका गेस्टहाऊसवर पोहोचल्या. यावेळी सभेला संबोधताना त्यांनी देश चार-पाच लोकांच्या हातात गहाण असल्याचे म्हटले. या निवडणुकीत तुम्ही तुमचे आणि तुमच्या मुलांचे भविष्य पाहून मतदान करा असे त्या म्हणाल्या. सिरसा बाजार येथे जनसंपर्क करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची पर्वा न करता त्या पायी चालू लागल्या. एसपीजी तर्फे फॉर्च्युनर गाडीची व्यवस्था करण्यात आली होती.
पर्रिकरांना श्रद्धांजली
लोकसभा निवडणुकीत मिशन साऊथ मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारतील राज्यांमध्ये दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी हैदराबाद-कर्नाटक क्षेत्रातील कलबुर्गीमध्ये निवडणूकीची प्रचार सभा घेतली. जनतेला संबोधित करण्याआधी राहुल गांधी यांनी दोन मिनिटाचे मौन राखून पर्रिकरांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली.