लखनऊ : काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या राज्यातून येणारे मजूर कोरोनाबाधित होऊन येत असल्याचा दावा केला आहे. प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये योगी, मुंबईतून येणारे प्रवासी कामगार कोरोना संक्रमित असल्याचं म्हणाले आहेत. योगींच्या याच विधानावरुन प्रियंका गांधींनी त्यांना याबबत संतप्त प्रश्न विचारत स्पष्टीकरण देण्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, 'उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं हे विधान ऐकलं. सरकारने दिलेल्या आकड्यांनुसार, जवळपास 25 लाख लोक यूपीत परत आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानानुसार, महाराष्ट्रातून परत आलेले 75 टक्के, दिल्लीतून परत आलेले 50 टक्के आणि इतर प्रदेशातून परत आलेले 25 टक्के लोक कोरोना संक्रमित आहेत.'


प्रियंका गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आदित्यनाथ म्हणत आहेत की, 'हे आमच्यासाठी मोठं आव्हान आहे. आमची टीम मोठ्या हिंमतीने याचा सामना करत आहे. संपूर्ण राज्यात 75 हजार आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. चाचणी, परीक्षण आणि उपचारांमुळे आम्ही बऱ्याच प्रमाणात कोरोनाला नियंत्रित करण्यात यशस्वी झालो आहोत'


केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही - राहुल गांधी


योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये 10 लाखहून अधिक लोक कोरोनाग्रस्त आहेत असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं का? पण त्यांच्या सरकारकडून आलेल्या आकड्यांनुसार, कोरोनाबाधितांची संख्या 6228 इतकी आहे. त्यांच्याद्वारा सांगण्यात आलेल्या संख्येला काय आधार आहे? परत आलेल्या प्रवाशांमध्ये संसर्गाची ही टक्केवारी कुठून आली? या टक्केवारीला आधार काय? असे संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहेत. 


जर अशाप्रकारची आकडेवारी आहे तर इतक्या कमी प्रमाणात चाचण्या का होत आहेत? हे आकडे उत्तर प्रदेश सरकारच्या इतर आकड्यांप्रमाणेच अप्रमाणित आणि बेजबाबदार आहेत? जर मुख्यमंत्र्यांचं विधान सत्य असेल तर सरकारने संपूर्ण पारदर्शकतेसह चाचण्या केलेला डेटा आणि इतर तयारीबाबतची संपूर्ण माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणीही प्रियंका गांधी यांनी केली आहे.