नवी दिल्ली : राजकारणात सक्रिय प्रवेशानंतर प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा देशभरात सुरु आहे. प्रियंका गांधी यांच्या सक्रिय सहभागामुळे काँग्रेसमध्ये नवं चैतन्य येईल अशी अनेक नेत्यांना आशा आहे. काँग्रेसच्या महासचिवपदी प्रियंका गांधी यांनी निवड झाल्यानंतर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक असं ट्विट केलं ज्यामुळे आता नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार का अशी चर्चा आहे. राहुल गांधी यांनी जेव्हा फ्रंटफुटवर खेळण्याची गोष्ट केली होती तेव्हाच असा अंदाज बांधला गेला होता की, काँग्रेस युपीमध्ये मोठा दाव खेळू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल सिब्बल यांनी ट्विट केल्यानंतर आता प्रियंका गांधी वाराणसीमधून निवडणूक लढवणार का अशी चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली तर वाराणसीची निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट केलं की, 'मोदीजी आणि अमित शाह यांनी काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला होता. प्रियंका गांधी आता पूर्वांचलमध्ये आल्याने आम्ही पण बघू ....मुक्त वाराणसी? ....मुक्त गोरखपूर?'. या दोन्ही जागा पूर्वांचलमध्ये येतात. ज्याची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. प्रियंका मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेस याचा विचार करु शकते.


प्रियंका गांधी या लोकसभा निवडणूक लढवतील का असं जेव्हा राहुल गांधी यांना विचारण्यात आलं. तेव्हा 'हा निर्णय पूर्णपणे प्रियंकाचा असेल असं त्यांनी म्हटलं होतं. आमचं हे मोठं पाऊल उचलण्यामागचं कारण हेच होतं की आम्ही बॅकफूटने नाही तर फ्रंटफूटने लढणार आहोत. काँग्रेस पक्ष पूर्ण जोर लावून ही निवडणूक लढेल. मी आनंदी आहे कारण प्रियंका खूप कर्मठ आणि सक्षम आहे आणि ती आता माझा सोबत काम करणार आहे.'


प्रियंका गांधी याआधी फक्त अमेठी आणि रायबरेलीमध्ये प्रचार करत होत्या. पण आता त्यांना युपी सारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सत्तेत येण्यासाठी युपीमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकणं फार महत्त्वाचं असतं. 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी येथे मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या होत्या.