उदयपूर : काँगेसचे अखिल भारतीय चिंतन शिबीर सुरु असतानाच पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड ( Sunil Jakhad ) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी चिंतन शिबिराच्या माध्यमातून अध्यक्षपदाबाबत ठोस संदेश जनतेत जाणे महत्त्वाचे आहे, असा सूर लावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील जाखड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची स्तुती केली आहे. राहुल गांधी चांगले व्यक्ती आहेत. मात्र, काही लोकांनी त्यांना घेरले आहे. राहुल गांधी यांच्यामुळेच मी पक्षात होतो, असे त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान, अध्यक्ष सोनिया गांधी ( Soniya Gandhi ) यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी एक मुद्दा उपस्थित केला. यावेळी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.


आचार्य प्रमोद कृष्णन म्हणाले, राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष व्हावे ही सगळ्यांची इच्छा आहे. हे पद त्यांनी स्वीकारावे यासाठी २ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु ते त्यासाठी तयार नाहीत. ते या पदासाठी राजी नसतील तर प्रियांका गांधी ( Priyanka Gandi ) यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात यावे असे ते म्हणाले.


यावर मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी कृष्णन यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कृष्णन यांनी त्यास दाद दिली नाही. यांनतर अनेक नेत्यांनी कृष्णन यांच्या मागणीला पाठिंबा दिला.


प्रियांका यांना केवळ उत्तर प्रदेशपुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही. दोन वर्षांपासून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. स्वत:चे घर आधी मजबूत करू तेव्हाच भाजपशी लढता येईल, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड ऑगस्टपर्यंत करायची आहे. मात्र, यासंदर्भात पक्षामध्ये अद्याप स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे.