प्रियंका गांधी-वाड्रा ट्विटरवर होतायंत ट्रेंड
प्रियंका गांधी यांच्या राजकारणात प्रवेशाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
मुंबई : प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या सक्रीय राजकारणातल्या प्रवेशानंतर देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. प्रियंका गांधी आज ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. प्रियंका गांधी-वाड्रांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी होती. अनेकदा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाहीररित्या याबाबत आवाज देखील उठवला. मोदींच्या लाटेनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका लाओ, काँग्रेस बचावचे पोस्टर्स देखील लावले होते. पण त्यावेळी प्रियंका गांधी यांचा राजकारणात येण्याविषयची कोणतीच इच्छा दिसत नव्हती. दुसरीकडे राहुल गांधी यांना काँग्रेसचा चेहरा बनवण्यासाठी देखील प्रियंका यांनी राजकारणात येण्याविषयी संयम बाळगल्याच्या देखील चर्चा होत्या. पण अखेर आज त्यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं ट्रम्प कार्ड काढल्याचं देखील चर्चा आहे. प्रियंका गांधी यांना राजकारणात पाहण्यासाठी अनेकांमध्ये उत्सूकता होती. विशेष म्हणजे दिल्लीच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशमधून जातो त्या उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपवडण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधी येणाऱ्या काळात काँग्रेसला कशा प्रकारे उभारी देतात हे पाहावं लागेल. याआधी प्रियंका गांधी या फक्त त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेली आणि भाऊ राहुल गांधी यांचा मतदारसंघ अमेठीमध्ये जात होत्या. पण आता त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे या २ मतदारसंघापुरताच मर्यादीत न राहता त्यांना पक्ष वाढवण्याच्या दिशेने देखील काम करावं लागणार आहे.
प्रियंका गांधी वाड्रा यांच्या सक्रीय राजकारणातल्या प्रवेशानंतर भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. बहिणीला राजकारणात उतरवून काँग्रेसने राहुल गांधी अपयशी झाल्याचं मान्य केल्याचा टोला भाजपने लगावला आहे. यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात सपा-बसपा आणि काँग्रेस यांच्यात दुरावा वाढेल अशी टीका जनता दल संयुक्तने केली आहे. तर प्रियंकांबाबत हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. त्यांचं काम पाहून प्रतिक्रिया देऊ असं उत्तर शिवसेनेनं दिलं आहे.