प्रियांका गांधी अखेर सक्रिय राजकारणात
काँग्रेस पक्षाने त्यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे
नवी दिल्ली - गांधी घराण्यातील आणखी व्यक्ती आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी-वाड्रा या अखेर सक्रिय राजकारणात आल्या आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात होती. अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा औपचारिकपणे काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे.
काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्याकडे उत्तर प्रदेश या संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांच्यावर माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची छबी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस कायकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश हे सर्वांत महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. येत्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केली आहे. या आघाडीत काँग्रेसला सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे एकीकडे गेल्या निवडणुकीत चमकदार कामगिरी करणाऱ्या भाजपचे आव्हान आणि दुसरीकडे सप-बसप आघाडीचे आव्हान या दोन्हींचा सामना करून उत्तर प्रदेशात काँग्रेसला आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. त्यासाठी प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रियांका गांधी यापूर्वी केवळ राहुल गांधी यांच्या अमेठी आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात तेथील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याचे त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात या मतदारसंघातील सर्व समन्वय साधण्याचे काम करीत होत्या. सक्रिय राजकारणात कधी यायचा हा निर्णय प्रियांका गांधी यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या स्वतः योग्यवेळी हा निर्णय घेतील, असे सोनिया गांधी यांनी याआधी म्हटले होते. आता ती योग्यवेळ आली असल्याचे प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशावरून दिसते.