`माझ्या कुटुंबाबद्दल बोलण्याची यांना सनक`, प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
मोदींची गेली पाच वर्ष देशात जनतेसाठी काय काम केली? याचं मात्र ते उत्तर देत नसल्याचं त्या म्हणाल्या
फतेहपूर : लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. फतेहपूरमध्ये काँग्रेसच्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे आपल्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांना प्रत्यूत्तर दिलंय. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींची ही वक्तव्यं 'सनक' असल्याचं म्हटलंय. मोदींची गेली पाच वर्ष देशात जनतेसाठी काय काम केली? याचं मात्र ते उत्तर देत नसल्याचं त्या म्हणाल्या.
'यांना सनक आहे, माझ्या कुटुंबीयांबद्दल बोलण्याची. नेहरुजींनी काय केलं? इंदिराजींनी काय केलं? यावरच त्यांचं ५० टक्के भाषण अवलंबून असतं. पण यांनी गेली पाच वर्ष काय केलं हे मात्र ते सांगत नाहीत' असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.
तुमच्या समस्यांबद्दल बोलणारं आणि त्यावर उपाय शोधणारं राजकारण निवडा, असंही आवाहन त्यांनी मतदारांना केलं. केवळ आपल्या क्षेत्रासाठी नाही, आपल्या गरजांपुरतं नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याला मजबूत करण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी योग्य सरकार निवडण्याचं आवाहनही त्यांनी केलं.