अहमदाबादमध्ये CAA विरोधी आंदोलकांची पोलिसांवर तुफान दगडफेक
जमावातील काही तरुणांनी या पोलीस कर्मचाऱ्याला वाचवले.
अहमदाबाद: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाचे लोण देशभरात पसरत असून अनेक ठिकाणी या हिंसक घटना घडत आहेत. अहमदाबादमध्येही गुरुवारी अशीच एक घटना घडली. येथील शाह-ए-आलम परिसरात काही समाजकंटकांनी पोलिसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाने पोलिसांचा घेरून तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलीस उपायुक्तांसह जवळपास १९ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
या व्हीडिओत पोलीस घटनास्थळावरून निघून जाण्याच्या प्रयत्नात असताना एक पोलीस कर्मचारी खाली पडल्याचे दिसत आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला जमावाने बेदम मारहाण केल्याचे समजते. मात्र, दुसऱ्या बाजूला जमावातील काही तरुणांनी या पोलीस कर्मचाऱ्याला वाचवले. या तरुणांनी तिरंगा उंचावत पोलीस कर्मचाऱ्याभोवती सुरक्षाकवच तयार केले आणि त्याला सहीसलामत बाहेर काढले.
या घटनेनंतर पोलिसांनी पाच हजार लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत ३२ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून लवकरच इतरांनाही ताब्यात घेण्यात येईल, असे अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गुरूवारी गुजरात बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पालनपुरमध्येही हजारोंच्या जमावाने रस्ता रोखून धरला होता. काही आंदोलकांनी पोलिसांच्या गाडी उलटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अहमदाबाद-पालनपुर महामार्ग बंद करण्यात आला होता.
तत्पूर्वी गुरुवारी देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांनी CAA आणि NCR विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबईतही हजारोंच्या संख्येने आलेल्या निदर्शकांनी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या आंदोलनात ज्येष्ठ समाजवादी नेते जी. जी. पारिख, सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, आनंद पटवर्धन, सुधींद्र कुलकर्णी, राज बब्बर, हुसेन दलवाई, मिलींद देवरा यांच्यासह अभिनेता फरहान अख्तर, राकेश ओमप्रकाश मेहरा, अभिनेत्री स्वरा भास्कर, सुशांत सिंग, सईद मिर्झा यांनीही या आंदोलनात सहभागी झाले होते.