मुंबई : सीएए आंदोलकांची इंटेरनेटबंदीद्वारे कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पण आंदोलकांच्या हाती अफवा पसरवणारं ऍप हाती लागलंय. या ऍपच्या माध्यमातून आंदोलक अफवा पसरवत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सध्या देशभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागत आहे. भावना भडकवणारे व्हिडिओ आणि मॅसेजस व्हायरल करुन या आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचं काम काही समाजकंटक करत होते. यावर उपाय म्हणून सरकारनं आंदोलन ज्या भागात भडकण्याची शक्यता आहे. त्या भागात इंटरनेट बंदी केली. सुरुवातीला याचे चांगले परिणाम दिसले. पण आंदोलकांनी इंटरनेट बंदीवरही उपाय शोधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलकांनी अफवा पसरवण्यासाठी हाँगकाँग पॅटर्न वापरायला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी ब्रिजफाय आणि फायरचॅट नावाचे मॅसेजिंग अॅप डाऊनलोड करायला सुरुवात केली आहे. या ऍपवर इंटरनेशिवाय मॅसेज पाठवता येतो. फक्त ब्लू टूथच्या सहाय्यानं एकमेकांशी कनेक्ट राहता येतं. १२ डिसेंबरपासून हे अॅप डाऊनलोडिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. 


अफवांचं पीक रोखण्यासाठी फक्त इंटरनेटबंदी करुन चालणार नाही. अफवा पसरवणाऱ्यांची नाकाबंदी करण्यासाठी अजून जालीम उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.



दिल्लीत हे अॅप डाऊनलोड करणाऱ्यांचं प्रमाण साठ पटीनं वाढलं आहे. सरकारचा सायबर सेल आता कामाला लागलं असून अफवा पसरवणारे हे अॅप बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.