13 हेअर पिन, 5 सेफ्टी पिन आणि 8 ब्लेड... तरीही वाचला तरुणाचा जीव, पण हे पोटात कसं गेलं?
Puducherry News : पुद्दुचेरी येथील रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने एका आजारी तरुणाच्या पोटातून 13 हेअरपिन, पाच सेफ्टी पिन आणि पाच रेझर ब्लेड सुरक्षितपणे बाहेर काढले आहेत. दोन तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तरुणाला जीवनदान मिळालं आहे.
Puducherry News : पुद्दुचेरीमधून (Puducherry) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रियेनंतर एका तरुणाच्या पोटातून अशा काही वस्तू निघाल्या आहेत ज्या पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षाच्या तरुणाच्या पोटातून ब्लेट, हेअर पिन आणि पाच सेप्टी पिन सापडल्या आहेत. डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून या तीक्ष्ण वस्तू वेळीच काढल्याने तरुणाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. तरुणाच्या पोटातून या 26 वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रिया (endoscopic procedure) करुन बाहेर काढल्या आहेत.
अनेक रुग्णालयांमध्ये तक्रार घेऊन गेला तरुण
या 20 वर्षीय तरुणाला अनेक दिवसांपासून मानसिक समस्या आहे. त्याच्यासाठी तरुणाचे औषध सुरू होते. जुलै 2023 पासून या तरुणाला सतत पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता. उपचारासाठी तरुणाला अनेक रुग्णालयांमध्ये दाखवले. पण त्याला कुठल्याही रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे वाटत नव्हते. त्याला अल्सरचे औषधही देण्यात आले होते. आराम न मिळाल्याने तरुणाने पुद्दुचेरीतील जीईएम रुग्णालय गाठले. तेव्हा तरुणाला पोटदुखी आणि रक्ताच्या उलट्यांचा त्रास होत होता. मात्र जीईएम रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना जबर धक्का बसला.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला गेल्या महिन्यापासून पोटात तीव्र वेदना होत होत्या. अनेक रुग्णालयात उपचार घेतले, पण त्याला बरं वाटतं नव्हते. यापूर्वी ज्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, त्यांनी त्याला अल्सरचे औषध दिले होते. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी प्रथम त्याची एन्डोस्कोपी केली. तपासणीदरम्यान तरुणाच्या पोटात तीक्ष्ण वस्तू सापडल्याने डॉक्टरांनाही धक्का बसला.
दोन तास सुरु होती शस्त्रक्रिया
त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून 13 हेअर पिन, 5 सेफ्टी पिन आणि 8 रेझर ब्लेड शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढल्या. बहुतेक गोष्टी या अतिशय टोकदार होत्या. मात्र, रुग्णाचे नशीब चांगले होते की डॉक्टरांनी कोणतीही चीरफाड न करता त्याच्या पोटातील सर्व वस्तू बाहेर काढल्या. महत्त्वाची बाब म्हणजे या गोष्टी पोटातून जास्त पुढे सरकल्या नाहीत. दोन तास चाललेल्या एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी या वस्तू काढल्या.
सगळ्या वस्तू पोटात कशा पोहोचल्या?
हे सगळं त्या मुलाच्या पोटात कसं पोहचलं याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, या मुलाने हे सर्व स्वतः खाल्ल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. पण या गोष्टींमुळे मुलाला कोणत्याही प्रकारचा अंतर्गत त्रास झाला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
डॉक्टरांनी काय सांगितले?
"मुलाला लहानपणापासून मानसिक त्रास आहे. त्याला विचारले असता त्याने कोणतीही तीक्ष्ण वस्तू खाल्ल्याच्या गोष्टीला नकार दिला. एंडोस्कोपी दरम्यान त्याच्या पोटात काही कठीण पदार्थ आढळले. त्याच्या पोटात अनेक धारदार वस्तू होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी शस्त्रक्रियेनंतर त्याने सामान्यपणे जेवण करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णाच्या पालकांनाही ओपन सर्जरी नको होती. पोटापर्यंत पोचण्यासाठी तोंडात नळी टाकून वस्तू काढू, असे आम्ही त्यांना सांगितले. ही एक आव्हानात्मक प्रक्रिया होती कारण या प्रकरणामध्ये मुलाच्या पोटात तीक्ष्ण वस्तू होत्या," असेही डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, तरुणाची प्रकृती आता सामान्य आहे. धारदार वस्तू काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या तरुणाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.