श्रीनगर : गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशरातून संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा हल्ला घडवून आणणाऱ्या आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया सध्या अनेकांच्याय भुवया उंचावत आहेत. सीआरपीएफ जवानांच्या बसच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आदिलच्या शालेय जीवनात घडललेल्या एका घटनेमुळे त्याच्या खासगी आयुष्यावर या साऱ्याचा परिणाम झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आदिलची आई, वडील आणि चुलत भावाने त्याला या साऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. 'एकदा शाळेत असताना त्याला पोलिसांनी जमिनीवर नाक घासायला लावलं होतं. तेव्हा ती घटना त्याच्या मनाला चटका लावून गेली होती. वारंवार तो त्याविषयीच विचार करत होता. आपल्याला अशी वागणूक का देण्यात आली?, असाच प्रश्न त्याला पडत होता', असं गुलाम हसन दार म्हणाले. त्या प्रसंगापर्यंत आदिल हा अतिशय धार्मिक मुलगा होता, असंही त्याचे वडील म्हणाले. 


हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी आदिलच्या कुटुंबीयांनी त्याच्या पार्थिवाशिवायच अंत्यविधी पार पाडले. आदिलच्या शरीराचे कोणतेच अवशेष मिळाले नसल्यामुळे त्याअभावीच अंत्यविधी पार पाडल्याची माहिती त्याचा नातेवाईक समीर अहमद याने दिली. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा या भागात सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. आदिलच्या अंत्यसंस्कारावेळी त्याच्या परिसरात राहणाऱ्या अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. आदिल या मार्गाला जाईल याची पुसटशीही कल्पना नसल्याचं म्हणत त्याच्या या कृत्याची माहिची माध्यमांच्याच माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली होती असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. 


आदिलच्या या कृत्याचा धक्का त्याच्या आईलाही बसला आहे. 'या वाईट मार्गापासून त्याला दूर ठेवण्याचा आम्ही प्रकर्षाने प्रत्न केला होता. पण, त्यात आम्ही अपयशी ठरलो', अशी खंत त्याच्या आईने व्यक्त केली. आदिलने २०१७ मध्ये शालेय शिक्षणापासून दूर होण्याचा निर्णय घेत धार्मिक शिक्षणाची वाट निवडली होती. मार्च २०१८ मध्ये सायकलवरुन तो घरातून जो निघाला त्यानंतर कधीच त्या ठिकाणी परतला नव्हता. त्या दिवशी कुटुंबीयांनी त्याला अखेरचं पाहिलं होतं. 


आदिलविषयीची ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर आता या हल्ल्याविषयच्या आणखी चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. अवंतीपोरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरकपीएफचे ४० जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली होती.