AAP vs BJP Brawl: दिल्ली महानगरपालिकेमधील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमधील एका मतावरुन झालेल्या वादानंतर सभागृहातच सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक एकमेकांशी भिडल्याचं चित्र पहायला मिळालं. यावेळेस महिला नगरसेविका एकमेकांची केस ओढत हाणामारी करत होत्या तर दुसरीकडे पुरुष नगरसेवक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारायचा प्रयत्न करत होते. या राड्यादरम्यान काही नगरसेवक बेशुद्धही पडल्याचं दिसून आलं. 


10 जणांनी एकाला मारल्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम आदमी पार्टी आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मतमोजणी सुरु असताना हाणामारी झाली. यापूर्वी काही दिवसांआधी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान राडा झाला होता. त्याची पुनरावृत्ती आज सभागृहामध्ये पहायला मिळाली. आज मतमोजणी सुरु असताना झालेल्या वादानंतर आम आदमी पार्टी आणि भाजपाचे नगरसेवक पुन्हा एकदा भिडले. पुरुषांबरोबरच महिला नगरसेविकाही एकमेकांनी मारहाण करत होत्या. सभागृहातील चित्र हे एखादं रणांगण असल्यासारखं दिसत होतं. महिला नगरसेविका एकमेकींच्या केस खेचत होत्या. तर दुसरीकडे पुरुष नगरसेवक जोरदार हाणामारी, धक्काबुक्क्यांनी एकमेकांना मारत असल्याचं दिसून आलं. महापौर निवडीचा वाद कोर्टातही गेला आहे. आज झालेल्या हाणामारीनंतर थेट पोलिसांनाच यामध्ये हस्ताक्षेप करावा लागला. आम आदमी पार्टीच्या 10 नगरसेवकांनी भाजपाच्या एका नगरसेवकाला लाथा-बुक्क्यांनी मारल्याचा आरोप भाजपाच्या एका महिला नगरसेवकाने केला. 



काही नगरसेवकांना आली भोवळ


काही दिवसांपूर्वीच आपच्या डॉक्टर शैली ओबोरॉय या महापौर म्हणून निवडून आल्यापासून दिल्ली महानगरपालिकेतील भाजपा आणि आप संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सभागृहामध्ये सुरु झालेला वाद नंतर सभागृहाबाहेरच्या लॉबीमध्येही सुरु असल्याचं दिसून आलं. ही हाणामारी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की काही नगरसेवक पडले, काहींच्या पायांना दुखापत झाली, असं एका नगरसेवकाने सांगितलं. काही नगरसेवकांची या सर्व गोंधळादरम्यान घुसमट झाल्याने त्यांना भोवळ आली. अन्य सहकारी या नगरसेवकांना टेबलवर झोपवून कागदाने हवा घालतानाचे चित्र पहायला मिळालं. आपने भाजपाकडून सत्ता खेचून आणल्यानंतर महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समितीच्या निवडणुकीतही गोंधळ दिसून आला.



एका मतावरुन राडा...


अमर कॉलिनीमधील भाजपाचे नगरसेवक शरद कपूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपच्या कारभारावर टीका केली आहे. "त्यांच्या महापौराला मेजेस करण्यात आला की हे मत रद्द करा. ते मत रद्द करुन निकाल जाहीर करताना आम्ही आक्षेप घेतला तर त्यांनी हाणामारी सुरु केली असा आरोप एका भाजपा नगरसेवकाने केला आहे. आम्ही त्यांना असं न करण्यासाठी मध्यस्थी करत होतो तर आम्हाला मारहाण करण्यात आली," असं कपूर यांनी सांगितलं. कपूर यांना आपवाल्यांचा आरोप आहे की भाजपाला त्यांचा पराभव पचत नाहीय, असं म्हणत एका पत्रकारने प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, कपूर यांनी "कसला पराभव? स्टॅण्डींग कमिटीचे अध्यक्ष, सर्व कायदेशीर तज्ज्ञ सांगत आहेत की ते मत योग्य आहे. मात्र गुंडगिरी करुन मत चुकीचं असल्याचं त्यांना सांगायचं आहे. आम्ही कोर्टात जाऊ," असं उत्तर दिलं.



न्यायालयात गेल्याने मतदान...


"आम्ही उच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर हे मतदान होत आहे. नाहीतर ते त्यांच्या दाव्यावर अडून होते की निवडणूक तिथूनच कंटीन्यू करणार. रात्री नोटीस आल्यावर पहिल्यापासून निवडणूक करण्यात आली," असंही शरद कपूर म्हणाले.