नवी दिल्ली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. एवढचं नाही तर सोशल मीडियाच्या माध्यामातून यंदाच्या दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थितीत दिल्लीमध्ये देखील फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत कोणी ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत फटाके फोडले तर त्या व्यक्तीस दीड ते ६ वर्षांपर्यंत शिक्षा होवू शकते. दिल्लीमधील वाढत्या प्रदुषणाचा स्तर लक्षात घेत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिल्लीत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पोलिस अधिकारी, महापालिका, परिवहन विभाग आणि जिल्हा अधिकारी देखील उपस्थित होते.  ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांद्वारे प्रदूषण वाढवणाऱ्यांविरोधात वायू कायद्यांतर्गत सरकार कारवाई करण्यात येईल. असं करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला जाणार असून दीड वर्ष ते अधिकाधिक ६ वर्षांची शिक्षा ठोठावणार असल्याचे राय यांनी सांगितले आहे. 


याप्रकरणी दिल्ली पोलीस थेट कारवाई करणार आहेत. शिवाय जिल्हाधिकारी देखील यावर लक्ष ठेवतील आणि दिल्ली पोलिसांना तशी कल्पना देतील. या संदर्भात दिल्ली पोलीस विस्तृत गाइडलाइन देखील जारी करणार आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 


राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सोमवारी जारी केलेल्या एका आदेशात एनसीआरमध्ये फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा हा आदेश दिल्ली आणि आसपासच्या १२ जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे.