Crime News : पंजाबमधील (Punjab) होशियारपूरमध्ये शनिवारी एक मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. होशियारपूरमधील (Hoshiarpur) गडशंकर-नांगल मुख्य रस्त्यावरील शाहपूर घाटा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिली. भरदिवसा झालेल्या या अपघातात ट्रॅक्टर चालक ट्रॅकच्या चाकात अडकून सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत गेला होता. या अपघातामुळे ट्रॅक्टर चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको करत पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी ट्रक चालकाच्या अटकेची मागणी करत सुमारे सहा तास रस्ता रोखून धरला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी सकाळी झालेल्या अत्यंत भीषण अपघातात वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रेलरला स्टोन क्रशरने भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. यामुळे ट्रॅक्टरचा चालक स्वतःच्याच ट्रॅक्टरच्या टायरमध्ये अडकला. त्यानंतर तो 500 मीटरपर्यंत फरफटत गेला. त्यामुळे त्याच्या शरीराचे तुकडे सगळ्या रस्त्यावर विखुरले होते. याबाबत बोलताना होशियारपूरचे पोलीस अधीक्षक मेजर सिंह यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी शाहपूर गावाजवळ हा अपघात झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपनगर जिल्ह्यातील भांगलान खेडा गावात राहणारा 21 वर्षीय सुखदेव सिंग पहाटे आपल्या ट्रॅक्टर-ट्रेलरमधून वाळू घेऊन जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या स्टोन क्रशरने भरलेल्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. अपघातात चालक सुखदेव हा चालत्या ट्रॅक्टरवरून पडला आणि मागच्या चाकाखाली आला. चाकात अडकल्याने सुखदेव हा पाचशे मीटरपर्यंत फरफटत गेला. वेग जास्त असल्याने अपघातानंतरही ट्रॅक्टर चालत होता. हा अपघात एवढा भीषण होता की सुखवदेवच्या शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले गेले होते. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.


या सगळ्या प्रकारानंतर सुखदेवचे वडील जसविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील संतप्त नागरिकांनी पीडितेचा मृतदेह अड्डा शाहपूर येथे ठेवला आणि आंदोलन केले, ज्यामुळे सहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली.


दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. नांगल रोडवर टिप्परवाल्यांची दहशत आहे. आरोपी टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.