Shocking Video : पंजाबमधल्या अमृतसरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही गुंडांनी एका एनआरआय व्यक्तीवर घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एनआरआय (NRI Firing) गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. आपल्या वडिलांना मारू नका असं हातापाया पडून त्याची मुलं विनवणी करत होते, पण गुंडांनी बायको मुलांसमोर त्या एनआरआय व्यक्तीवर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
ही सर्व घटना अमृतसरमधल्या (Amritsar) दबुर्जी इथली आहे. या ठिकाणी एनआरआय असलेले सुखचैन सिंह हे आपल्या कुटुंबासह राहातात. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारात बाईकवरुन आलेले दोन हल्लेखोर घरात घुसले. त्यांनी कुटुंबियांशी आधी बातचित केली त्यानंतर त्यांच्या कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद झाला. अचानक तिघांमधल्या एकाने स्वत:जवळची बंदूक काढली आणि सुखचैन यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या घटनेने घरात आरडा-ओरडा सुरु झाला. घरातील महिला आणि मुलं आरोपींच्या हातापाया पडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण आरोपीने गोळीबार करत तिथून पळ काढला.


एनआरआय गंभीर जखमी
गोळीबारात सुखचैन सिंह हे गंभीर जखमी झाले असून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. खंडणी मागण्यासाठी हे गुंड सुखचैन यांच्या घरात घुसले असण्याची प्राथमिक शकत्या पोलिसांनी वर्तवली आहे. याप्ररणी पोलिसांनी तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे. 


पोलिसांचा तपास सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुखचैन सिंह हे अमेरिकेत राहातात. काही दिवसांपूर्वीच ते पंजाबमध्ये आपल्या घरी परतले होते. अमृतसरमध्ये एक हॉटेल सुरु करणार होते. याशिलाय अलीकडेच त्यांनी दीड कोटी रुपयांची एक अलिशान कार खरेदी केली होती. सुखचैन सिंह यांची गडगंज संपत्ती पाहून गुंड खंडणी मागण्यासाठी त्यांच्या घरात शिरले. खंडणी देण्यास नकार दिल्याने गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 



सीसीटीव्ही व्हिडिओ
या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. बाईकवरुन दोन हल्लेखोर सुखचैन सिंह यांच्या घरासमोर आले. त्यांनी आपली बाईक घरासमोर उभी केली आणि घरात घुसून त्यांनी सुखचैन यांच्यावर गोळीबार केला. यानंतर बाईकवर बसून ते पुन्हा जाताना दिसत आहेत. दिवसाढवळ्या घरात घुसून गोळीबाराची घटना घडल्याने पंजाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.