Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात वृद्ध महिलेला होत असलेली मारहाण पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलेच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी (Punjab Police) मुलाला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

75 वर्षीय आशा वर्मा त्यांचा मुलगा अंकुर वर्मा, सून आणि नातवासोबत ग्यानी झैल सिंग नगर, रोपरमध्ये राहतात. वृद्धापकाळामुळे त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. आशा वर्मा यांच्या मुलीचे नाव दीपशिखा आहे. भाऊ अंकुर वर्मा तिच्या आईला अमानुषपणे मारहाण करतो, अशी तक्रार आशा वर्माने पोलीस ठाण्यात केली होती. दीपशिखाने लुधियाना येथील सामाजिक कार्यकर्ता गुरप्रीत सिंग यांच्याकडेही मदत मागितली. गुरप्रीत त्याच्या टीमसोबत दीपशिखाच्या आईच्या घरी पोहोचला आणि तिथून तिची सुटका करून तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं.


दीपशिखाने पोलिसांना सांगितले की, अंकुर वर्मा हा व्यवसायाने वकील आहे. तो आईला मारहाण करतो. पुरावा म्हणून दीपशिखाने आई आशा वर्मा यांच्या खोलीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही दिले. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. 2 ऑक्टोबरच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आशा वर्मा बेडवर पडलेल्या दिसत होत्या. त्यावेळी अंकुर वर्मा तेथे येतो आणि त्यांना मारहाण करतो. अंकुर आईचे केस ओढतो, तिचे डोके वारंवार आपटतो आणि तिला कानाखाली मारतो, गालावर चापट मारतो. त्यानंतर अंकुरचा मुलगा खोलीत येतो आणि आशा यांच्या पलंगावर पाणी फेकतो. त्यानंतर तो अकुंरला फोन करुन सांगतो की आजीने लघवी केली आहे. यानंतर अंकुर आशा देवीला पलंगावर ढकलून मारहाण करतो.


दीपशिखाने भावाच्या घरी लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये अॅक्सेस घेतला होता. मी फुटेज पाहिले तेव्हा भाऊ आईवर अत्याचार करताना दिसला. यानंतर मी पोलिसांत तक्रार करून सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मागितली, असे दीपशिखाने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वकील अंकुर वर्माविरुद्ध भादंवि कलम 327 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर अंकुरला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. अंकुरची पत्नी आणि मुलाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.



दीपशिखाने सांगितले की, तिची आई पेशाने प्राध्यापिका होती. सध्या तिला 35 ते 40 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. या सगळ्या प्रकारानंतर आशा वर्मा यांना जबर धक्का बसल्याचे दीपशिखाने सांगितले., वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आरोपी वकील अंकुर वर्माविरोधात लोकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. रोटरी क्लब आणि रोपर बार असोसिएशनचे तो सदस्य होता. या प्रकारानंतर अंकुर वर्माला दोन्ही ठिकाणांहून हाकलून देण्यात आले आहे.