नवी दिल्ली : 2015 मध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबच्या अपमान प्रकरणी झालेल्या हिंसेची स्पेशल टीम चौकशी करत आहे. या प्रकरणात या टीमने अभिनेता अक्षय कुमारची चौकशी केली आहे. एसआयटीने चंडीगढमध्ये अक्षय कुमारची चौकशी केली. अक्षय कुमारला एकूण 42 प्रश्न विचारण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार एसआयटी समोर हजर झाला. पंजाब पोलिसांची एसआयटीने याआधी अक्षय कुमारला 21 नोव्हेंबरला अमृतसर सर्किट हाउसमध्ये हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर त्याला चंडीगढचा पर्याय देखील देण्यात आला. एसआयटीचे सदस्य आणि पोलीस महानिरीक्षक कुंवर विजय प्रताप सिंह यांनी म्हटलं की, आम्ही त्यांना चंडीगढला हजर राहण्याची सूट दिली आहे.


जस्टिस रणजीत सिंह आयोगाच्या रिपोर्टमध्ये अक्षय कुमारचं नाव आल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.


अक्षय कुमारवर कोणते आरोप?


2015 मध्ये पंजाबमध्ये श्री गुरुग्रंथ साहिब आणि अन्‍य धार्मिक ग्रंथांचा अपमान झाला होता. यामुळे तेथे हिंसा झाली होती. पंजाबच्या बहबल कलांमध्ये आंदोलन झालं होतं. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली होती. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते.


2017 मध्ये पंजाबमध्ये काँग्रेसची सरकार बनली. यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या घटनेच्या चौकशीसाठी जस्टीस रणजीत आयोगाचं गठन केलं होतं.


यावेळी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमवर हिंसा भडकवण्याचा आरोप झाला होता. अक्षय कुमारवर आरोप आहे की, त्याने राम रहिमला माफी मिळावी म्हणून मध्यस्थी केली होती. यावर चर्चा करण्यासाठी अक्षय कुमारने सुखबीर बादल आणि काही लोकांची आपल्या घरी बैठक घेतली होती.


अक्षय कुमारने आरोप फेटाळले


अभिनेता अक्षय कुमार यांनी या आधीच हे आरोप फेटाळले आहेत. अक्षयने माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सोबत कोणताही बैठक झाली नसल्याचं म्हटलं आहे. अक्षयन हे देखील म्हटलं आहे की, तो राम रहिमला कधीच भेटला नाही. राम रहिम सध्या बलात्काराच्या आरोपात 20 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगत आहे.


दुसरीकडे सुखबीर बादल यांनी देखील म्हटलं की, पंजाबच्या बाहेर ते कधीच अक्षय कुमारला भेटले नाहीत. एसआयटीने पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांची याआधीच चौकशी केली आहे.