हरजभजन सिंगची नवी इनिंग! `आप`कडून राज्यसभेवर जाणार, पाच जणांची नावं निश्चित
पंजाबमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी `आप`ने उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत
Punjab Rajy Sabha Election: पंजाबमधील 7 पैकी 5 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे. राज्यसभेच्या या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. 31 मार्च रोजी पंजाबमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत राज्यातील राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा 'आप'च्या खात्यात जातील, हे जवळपास निश्चित आहे.
पाच राज्यसभा सदस्य असलेले सुखदेव सिंग, प्रताप सिंग बाजवा, श्वेत मलिक, नरेश गुजराल आणि शमशेर सिंग दुल्लो यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे.
पंजाबमधून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पाच जागांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आपकडून (AAP) दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा (Raghav Chadha), आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक (Sandeep Pathak), भारतीय खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh), लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल (Ashok Mittal) आणि उद्योगपती डॉ. संजीव अरोरा (Sanjiv Arora) यांची नावं यासाठी निश्चित करण्यात आली आहेत.
राज्यसभेवर या पाच जणांची वर्णी
संदीप पाठक – पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या विजयामागे ज्या रणनीतीकाराचं नाव पुढे आलं, ते नाव म्हणजे संदीप पाठक. डॉ.संदीप पाठक यांनी 3 वर्ष पंजाबमध्ये तळ ठोकून बूथ स्तरापर्यंत संघटना स्थापन केली. डॉ. संदीप पाठक हे आयआयटीमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. याआधी ते लंडनमध्ये काम करत होते, तेथून परतल्यानंतर ते बराच काळ पंजाबमध्ये 'आप'साठी काम करत आहेत. 'आप'च्या पंजाबमधील विजयाचे श्रेय त्यांना दिलं जात आहे. संदीप पाठक हे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या जवळचे मानले जातात.
राघव चढ्ढा – दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांना पंजाब निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी बनवण्यात आलं होतं. राघव चड्ढा दीर्घकाळापासून पक्षासाठी मोठं काम करत आहेत आणि त्यांनी पंजाबच्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या एक वर्षापासून ते पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांसोबत काम करत होते. राघव चढ्ढा संसदेत खूप उपयुक्त ठरू शकतात, असा पक्षाचा विश्वास आहे.
हरभजन सिंग - हरभजन सिंग प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत आणि ते देशातील युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात .पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणूक प्रचारादरम्यान जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती. भगवंत मान क्रीडा विद्यापीठाची कमानही हरभजन सिंगकडे देऊ शकतात.
अशोक मित्तल - अशोक मित्तल हे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात. सामान्य कुटुंबातून आलेल्या अशोक मित्तल यांनी स्वबळावर यश संपादन केलं. LPU हे भारतातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.
संजीव अरोरा : संजीव अरोरा हे पंजाबमधील आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार आहेत. ते पंजाबमधील एक मोठे उद्योगपती आहेत. कृष्णा प्राण ही ब्रेस्ट कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्ट देखील ते चालवतात. कॅन्सरमुळे त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांनी ट्रस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. संजीव अरोरा 15 वर्षांपासून पंजाबमधील लोकांची सेवा करत आहेत.