छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार आपला अपमान केला जात असल्याचा आरोप राधिका खेरा यांनी केला आहे. आपण पक्षाच्या हिंदूविरोधी (anti-Hindu ideology) विचारसणीला फॉलो न केल्याने नेतृत्वाने दुर्लक्षित केला असा आरोप त्यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राधिका खेरा यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या मद्य पिण्यासाठी ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोटही केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान छत्तीसगड काँग्रेसचे मीडिया चेअरमन सुशील आनंद शुक्ला यांनी मला मद्यसेवन करण्याची ऑफर दिली. 5 ते 6 कार्यकर्त्यांसह ते दारुच्या नशेत माझ्या रुमचा दरवाजा ठोठावत असत. मी सचिन पायलट आणि जयराम रमेश यांच्याकडे तक्रार केली, पण काही झालं नाही," असा दावा राधिका खेऱा यांनी केला आहे.


आपण पक्षाची हिंदूविरोधी विचारसरणी मान्य न केल्याने दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोपही राधिका खेरा यांनी केला. "30 तारखेला मी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात सुशील आनंद शुक्ला यांच्याशी बोलायला गेलो तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ केली आणि माझ्यावर ओरडले. त्यांनी मला आतमध्ये बंद केलं, त्यांनी इतर दोन राज्य प्रवक्त्यांसोबत मला शिवीगाळ केली. मी आरडाओरडा केला पण कोणीच दार उघडले नाही. मला मारहाण करण्यात आली. मी काँग्रेसच्या महामंत्री यांच्याकडेही तक्रार केली पण कोणीही माझ्या तक्रारींची दखल घेत नाही,” असं त्या पुढे म्हणाल्या.


पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेसवर प्रतिस्पर्ध्यांनी लावलेल्या हिंदूविरोधी आरोपांवर मी कधीही विश्वास ठेवला नाही. पण 22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर वास्तविकता समोर आली. "काँग्रेस ही रामविरोधी, सनातनविरोधी आणि हिंदूविरोधी आहे, असे मी नेहमी ऐकले होते, पण मी त्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. महात्मा गांधी प्रत्येक सभेची सुरुवात 'रघुपती राघव राजा राम' या शब्दाने करत असत. पण जेव्हा मी माझ्या आजीसह राम मंदिरात गेली आणि तेथून परत आल्य़ावर माझ्या घराच्या दारावर 'जय श्री राम' झेंडा लावला तेव्हा वास्तव समोर आलं. काँग्रेस पक्ष माझा तिरस्कार करु लागला. मी फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करायची तेव्हा मला शिवीगाळ केली जात होती आणि निवडणूक प्रक्रिया सुरु असताना अयोध्येला का गेली अशी विचारणा केली". 


राधिका खेरा यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवलेल्या राजीनाम्यात पक्षातील "पुरुषवादी मानसिकतेने" ग्रस्त असलेल्यांना उघड करण्याची शपथ घेतली होती. अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यापासून स्वतःला रोखू न शकल्याने पक्षातूनच मला टीकेला सामोरे जावे लागल्याचे त्या म्हणाल्या.


"रामलल्लाचं जन्मस्थळ असणारं श्री अयोध्या धाम हे फार पवित्र असून, मी तिथे जाण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. पण मला तिथे गेल्यानंतर इतका विरोध सहन करावा लागेल याची कल्पना नव्हती."मी माझ्या आयुष्यातील 22 वर्षांहून अधिक वर्षे या पक्षाला दिली आहेत आणि एनएसयूआयपासून काँग्रेसच्या मीडिया विभागापर्यंत पूर्ण प्रामाणिकपणे काम केलं आहे. असे असूनही, अयोध्येत मी रामाला पाठिंबा देत असल्याने मला इतक्या तीव्र विरोधाला सामोरे जावं लागलं," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 


या आठवड्याच्या सुरुवातीला, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये राधिका खेरा यांनी अपमान झाल्यामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं. पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितलं की त्यांच्यात आणि एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यात झालेल्या वादातून हा उद्रेक झाला.