लखनऊ : रायबरेली जिल्ह्यातील ऊंचाहारमधील एनटीपीसी बॉयलर फुटल्याने २० लोकांचा मृत्यू झालाय. तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिका-यांनी सांगितले की, एनटीपीसीमध्ये झालेल्या स्फोटाचे कारण शोधले जात आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रूपये आणि जखमींना ५० हजार रूपये मदत जाहीर केलीये. सायंकाळी अचानक बॉयलरचा स्फोट झाला. आजूबाजूला असलेले २० कर्मचारी जागीच ठार झाले. हा स्फोट एवढा भंयकर होता की १० किलोमीटर परिसराला याचे हादरे बसले.


उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले, ‘जिल्हा प्रशासनाने २० लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केलंय’. तर पोलीस महानिर्देशक आनंद कुमार म्हणाले की, ‘गंभीररित्या जखमी झालेल्या २० लोकांना लखनऊला उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. १५ अन्य लोकांवर रायबरेलीमध्ये उपचार सुरू आहेत. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे’, असे ते म्हणाले. 


रायबरेली जिल्ह्यातील ऊंचाहार तहसील राजधानी लखनऊपासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. ही घटना सायंकाळी घडली. या घटनेनंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही दु:ख व्यक्त केलंय. सध्या इथे बचावकार्य जोरात सुरू आहे. जखमींवर उपचार सुरू असून अनेकांना घरीही सोडण्यात आल्याची माहिती आहे.