भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर संकटाकडे वाटचाल- रघुराम राजन
अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असणारी अनिश्चितता गंभीर संकटास कारणीभूत ठरू शकते.
नवी दिल्ली: वाढत्या वित्तीय तुटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था गंभीर संकटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. ते शनिवारी अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठात झालेल्या ओ. पी. जिंदाल व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीवर ताशेरे ओढले.
भारताचा विकास दर २०१६च्या पहिल्या तिमाहीत ९ टक्के होता. तेथून तो घसरण्यास सुरुवात झाली. जून २०१९ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासाचा दर गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी म्हणजे ५ टक्क्यांवर आला. त्यामुळे २०१९-२० या वर्षांसाठी हा दर ६.१ इतका कमी होईल, असा अंदाज रिझव्र्ह बँकेने व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असणारी अनिश्चितता गंभीर संकटास कारणीभूत ठरू शकते, असे रघुराम राजन यांनी म्हटले.
केंद्र सरकारकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादन (आयआयपी) निर्देशंकात १.१ टक्क्याची घसरण पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर रघुराम राजन म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था सुस्तीच्या टप्प्यातून जात आहे. आर्थिक क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्राला आधाराची गरज आहे. परंतु खरा प्रश्न असा आहे की देश विकासाचे नवे स्त्रोत शोधण्यात अपयशी ठरत आहे. भारताचा आर्थिक तणाव हे रोगाचे मूळ कारण नाही तर ते रोगाचे एक लक्षण आहे, असे राजन यांनी सांगितले.