काँग्रेस सत्तेवर आल्यास १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी- राहुल गांधी
प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही.
कांकेर: आगामी विधानसभा निवडणुकीत छत्तीसगढमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर १० दिवसांत गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. ते शनिवारी कांकेर येथील प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, या निवडणुकीत जनतेने आम्हाला विजयी करून दिले तर काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यापासून १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करेल. राहुल यांनी परप्रांतीय आणि रोजगाराच्या मुद्द्यावरूनही तरुणांना साद घालण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमणसिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. याऊलट आऊटसोर्सिंगमुळे बाहेरच्या प्रदेशातील लोकांना छत्तीसगडमध्ये रोजगार मिळाला.
निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करुन रिक्त पदे भरले जातील आणि स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. येत्या १२ तारखेला राज्यातील १८ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल.