नवी दिल्ली: पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकिरिणीची सोमवारची बैठक अत्यंत वादळी ठरली. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर राहुल गांधी यांनी पत्र पाठवणाऱ्या २३ ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षनिष्ठेविषयीच शंका उपस्थित केली. भाजपशी संगनमत करून काही नेत्यांनी हे पत्र पाठवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसताना हे पत्र पाठवण्यात आले. यावरुन राहुल गांधी यांनी संबंधित नेत्यांना अक्षरश: धारेवर धरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया गांधी आजारी असताना 'ते' पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज

राहुल गांधी यांचा हा घाव ज्येष्ठ नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत राहुल गांधी यांना प्रत्युत्तरही दिले. भाजपशी साटेलोटे असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले. तर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही ट्विटर करुन आपली नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी म्हणतात की, आमचे भाजपशी साटेलोटे आहे. आम्ही राजस्थान उच्च न्यायालयात य़शस्वीपणे काँग्रेसची बाजू मांडली. मणिपूरमध्ये काँग्रेसची बाजू लावून धरत भाजपला सत्तेवरून खाली खेचले. गेल्या ३० वर्षात एकदाही भाजपच्या बाजूने वक्तव्य केले नाही. तरीही आमचे भाजपशी साटेलोटे असल्याचा आरोप होतो, अशी खंत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. 



दरम्यान, या ट्विटवरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर कपिल सिब्बल यांनी हे ट्विट तात्काळ डिलीटही केले. राहुल गांधी यांनी वैयक्तीयरित्या माझ्याशी संपर्क साधला. आपल्या संदर्भात आरोप केले नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यामुळे आपण हे ट्विट डिलिट करत असल्याचे सिब्बल यांनी सांगितले.